सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; सतर्कतेचा इशारा

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र मंगळवारी पुन्हा दि. 26 जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागासह सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, ओढे नाल्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदी काठावरील गावामधील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यासाठी हवामान विभागाने दि. 28 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला होता. मात्र मंगळवारी पुन्हा दि. 26 जुलैपर्यंत रेड अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहर परिसरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून जोरदार वारे वहात होते. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. मुसळधार पावसामुळे पश्चिम भागातील नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे ओढे नाल्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. डोंगरदर्‍यामध्ये छोटे मोठे धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पश्चिम भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पावसामुळे भात लागणीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. मुसळधार पावसाने पश्चिम भागातील घाट रस्ता व डोंगरदर्‍यामध्ये दरडी पडण्याचे प्रकार सुरु आहेत. प्रशासनामार्फत या दरडी त्वरित हटवण्यात येत आहेत.

धोम बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असून धरणामध्ये पाण्याची आवक 4 हजार 500 क्युसेक्स होत आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग दुपारी 3 वाजल्यापासून वाढवण्यात आला आहे. 3 हजार 500 क्युसेक्स पाणी धोम धरणामध्ये सोडण्यात येत आहे. बलकवडी धरणाखालील बलकवडी, परतवडी, कोंढवली, नांदवणे, वयगाव, दह्याट, बोरगाव या गावातील नागरिकांना नदीपात्रात न जाण्याच्या सूचना दिल्या असून धरण प्रशासनाने कृष्णा नदी काठावरील गावांमधील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

कुडाळी मध्यम प्रकल्प असलेल्या महू धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे महू धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू होवू शकतो. कुडाळी नदी काठावरील नागरिकांनी नदीपात्रामध्ये प्रवेश करु नये. तसेच पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. सातारा तालुक्यातील ठोसेघर पासून 3 किलोमीटर असलेल्या मालोबा लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

महाबळेश्वरला 93.1 मि.मी. पाऊस

सातारा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 24.9 मि. मी., जावली 37.7 मि. मी., पाटण 40.9 मि. मी., कराड 9.0 मि. मी., कोरेगाव 8.0 मि. मी., खटाव 5.6 मि. मी., माण 1.3 मि. मी., फलटण 0.5 मि. मी., खंडाळा 2.8 मि. मी., वाई 15.9 मि. मी., महाबळेश्वर 93.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news