आनंदवार्ता ! खडकवासला धरण 92 टक्के भरले !

आनंदवार्ता ! खडकवासला धरण 92 टक्के भरले !

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा :  पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पानशेत-मुठा खोर्‍यात संततधार सुरू आहे. खडकवासला धरणातील साठा 92 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. 25) रात्री 11 वाजता खडकवासलातून 3424 क्युसेक वेगाने मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दिवसअखेर खडकवासला धरण साखळीत 18.59 टीएमसी म्हणजे 63.77 टक्के साठा झाला होता. सोमवारी (दि. 24) सायंकाळी खडकवासलातून मुठा कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. कालव्यात सध्या 1 हजार 5 क्युसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याची आवक वाढल्यास खडकवासलातून जादा पाणी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे मुठा नदीच्या तीरावरील रहिवाशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

खडकवासला जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी मंगळवारी धरणांची पाहणी केली. रायगड जिल्ह्यालगतच्या घाटमाथ्यासह धरणक्षेत्रात संततधार सुरू असल्याने दोन दिवसांत धरण साखळीत तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी जमा झाले. खडकवासला धरण साखळीची क्षमता 29.15 टीएमसी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 25 जुलै 2022 रोजी धरण साखळीत 20.86 टीएमसी म्हणजे 71.56 टक्के पाणी होते. तर, या वर्षी 18.59 टीएमसी म्हणजे 63.77 टक्के साठा आहे.

वरील तिन्ही धरणे अद्याप भरली नाहीत. संततधार पावसामुळे खडकवासलात पाण्याची आवक सुरू आहे. 92 टक्क्यांपर्यंत खडकवासलाची पातळी कायम ठेवून जादा पाणी नदीत सोडले जात आहे. पाण्याची आवक वाढल्यास जादा पाणी सोडले जाणार आहे.
– मोहन भदाणे,
उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

आठ ते दहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
– किसन केळतकर, शेतकरी, दापसरे

 

आजचा पाऊस
(मिलिमीटर)
टेमघर : 30
वरसगाव : 25
पानशेत : 28
खडकवासला : 5
सध्याचा पाणीसाठा
धरण टीएमसी टक्केवारी
टेमघर 1.68 45.23
वरसगाव 7.87 61.40
पानशेत 7.23 67.88
खडकवासला 1.81 91.81

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news