चिंतेची बाब ! राज्याच्या बहुतांश भागांतील भूजल पातळी दोन ते तीन मीटरने खालावली | पुढारी

चिंतेची बाब ! राज्याच्या बहुतांश भागांतील भूजल पातळी दोन ते तीन मीटरने खालावली

शिवाजी शिंदे : 

पुणे : राज्यातील भूजल पातळी दोन ते तीन मीटरने खालावलेलीच असून, काही भागात तर तीन मीटरपेक्षाही खोल पाण्याची पातळी गेलेली आहे. त्यामुळे चालू वर्षी राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला तरच पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकस यंत्रणेद्वारे दरवर्षी एका जलवर्षातून चार वेळा (ऑक्टोबर, जानेवारी, मार्च आणि मे) पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या विहिंरीमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणार्‍या मोसमे पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या अखेरचे राज्यातील पाऊस आणि ऑक्टोबर महिन्यातील भूजल पातळी यांच्या नोंदी घेऊन सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत अनुमान काढले जाते.

मे (2023) महिन्यात निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीचा अभ्यास राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागातील अधिकार्‍यांनी भूजल पातळी तपासण्यासाठी ऑक्टोबर 2022 ते मे 2023 या कालवधीत जलधारातून विविध कामांसाठी त्यातही मुख्यत्वे सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याच्या पातळीत झालेला बदल याचा अभ्यास केला. त्यानुसार मे अखेर निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीचा घेतलेल्या नोंदीची तुलना मागील पाच वर्षांच्या मे महिन्यातील भूजल पातळीच्या सरासरीशी केली असता, राज्यातील एकूण 3661 या निरीक्षण विहिरींपैकी 2805 विहिरींमधील भूजल पातळीमध्ये सरासरीपेक्षा वाढ, तर 856 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीत सरासरीच्या तुलनेत घट आढळून आलेली आहे. तर 22 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त घट, 47 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 2 ते 3 मीटरने घट दिसून आली, तर 170 निरीक्षण विहिरींमधील भूजल पातळीमध्ये 1 ते 2 मीटरने तसेच 617 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीमध्ये 0 ते 1 मीटरने घट झालेली आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाचा तुलनात्मक अभ्यास

वर्षभरात चार वेळा निश्चित केलेल्या विहिंरीमधील भूजल पातळीचा करण्यात येतो अभ्यास

राज्यातील 3 हजार 661 निरीक्षण विहिरींची पाणीपातळी आली मोजण्यात

हे ही वाचा :

रानडे ट्रस्ट फेरफार महसूल अधिकार्‍यांना भोवणार !

नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची भर पावसात धिंड

Back to top button