रानडे ट्रस्ट फेरफार महसूल अधिकार्‍यांना भोवणार !

रानडे ट्रस्ट फेरफार महसूल अधिकार्‍यांना भोवणार !

पुणे : पुण्यातील रानडे ट्रस्ट ही सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या कक्षेत येत नसतानाही महसूल विभागाने कोणतीही चौकशी न करता जमिनीच्या फेरफारमध्ये 'सोयी'प्रमाणे बदल केला. तत्कालीन महसूल राज्यमंत्री रामराजे निंबाळकर यांनी फेरफारमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, मिलिंद देशमुख, शिवाजी धनकवडे आणि सागर काळे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी न करता थेट नोंद घेतली. रानडे ट्रस्टचे विश्वस्त सुनील भिडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रांमध्ये असे नमूद केले आहे की, कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चॅरिटी ट्रस्ट या सार्वजनिक न्यासाची स्थापना 11 ऑक्टोबर 1915 रोजी त्यांच्या पत्नी स्वर्गीय रमाबाई महादेव रानडे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या 4 जून 1900 रोजी केलेल्या मृत्यूपत्रानुसार केली आहे.

स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन विश्वस्त श्रीनिवास शास्त्री यांनी नोंदणीकृत ट्रस्ट डीड 11 ऑक्टोबर 1924 रोजी जॉईंट रजिस्ट्रार हवेली, पुणे यांचे कार्यालयात नोंदणी क्रमांक 3538/1924 अन्वये नोंदली केली आहे. अशारितीने कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ट्रस्ट हा एक स्वतंत्र अस्तित्व असलेला वेगळा ट्रस्ट आहे. या ट्रस्टचे ई -25 प्रमाणपत्र 5 नोव्हेंबर 1959 रोजी नोंदले गेलेले आहे.
ट्रस्टच्या मालमत्तेत नाव बदल करण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले गेले. मात्र, त्यात बदल न करता महसुली बनावट कागदपत्रे सादर करणार्‍यांची घाईने नोंद घेऊन त्याचा फेरही घेण्यात आला. महसुली विभागाच्या दप्तरातील रानडे ट्रस्ट मालकीच्या जमिनी संदर्भात माहिती घेतली असता असे दिसून आले की, मिलिंद देशमुख, शिवाजी धनकवडे आणि सागर काळे यांची नावे फेरफार क्रमांक 877 आणि 909 अन्वये नोंदवली गेलेली आहे. महसुली अधिकार्‍यांकडे या तिघांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये चुका असूनही नियमबाह्य कामे केली गेली.

भिडेंच्या तक्रारीत असे होते मुद्दे
– ट्रस्टचे नाव त्यांना माहीत नसावे, त्यामुळे चुकीचे टाकले गेले आहे. त्यामध्ये कै. हा उल्लेख नाही.
– चुकीचा व आमच्याशी कुठलाही संबंध नसलेला सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटी, 846- शिवाजीनगर ,पुणे असा पत्ता टाकला आहे. वस्तूचा ट्रस्टचा नोंदणीकृत पत्ता 378 शनिवार पेठ आहे.
– पत्रातील तारीख व सही हस्तलिखित, तर उर्वरित मजकूर हा टाईप केलेला आहे.
– पत्रावर इतर कुठल्याही विश्वस्तांची सही नाही तसेच सदरचे पत्र काकडे यांनी विश्वस्त या नात्याने दिले आहे असा कुठलाही उल्लेख नाही.
– 2006 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने केलेल्या चौकशी अहवालात काकडे यांना वाढत्या वयामुळे स्मृतिभ—ंशाचा विकार झालेला आहे व ते मानसिकदृष्ट्या संतुलित अवस्थेत निर्णय घेण्याच्या क्षमतेत नाहीत.
– तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेल्या 12 जानेवारी 2007 रोजीच्या ठरावाच्या प्रतीमध्येदेखील या सर्व त्रुटी आढळून येत आहेत. त्यामुळे त्याचीदेखील फॉरेन्सिक ऑडिट होणे गरजेचे आहे.
– कागदपत्रांचे अवलोकन करता 13 ऑगस्ट 2007 रोजी अजून काही कागदपत्रे तहसीलदार यांच्याकडे दाखल केली गेली. त्यात उल्लेखित मजकूर असा आहे की, कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ट्रस्ट हा सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या अधीन कार्यरत असून, कै. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ट्रस्टची कोणतीही वेगळी नोंदणी केलेली नाही.
– 26 नोव्हेंबर 2007 रोजी मिलिंद भगवान देशमुख यांनी पत्र दिलेले आहे. कोणत्याही विश्वस्त अथवा इतर कोणत्याही सक्षम पद्धतीने सही केलेली नाही. तसेच मिलिंद देशमुख यांनी स्वतः सही केलेली आहे.
– 26 नोव्हेंबर 2007 रोजी तहसीलदार यांना आणखी एक पत्र दाखल केले गेले आहे. त्यातही असे नमूद केले आहे की, ही ट्रस्ट सोसायटीचे अधीन काम करत आहे.
-25 नोव्हेंबर 2017 रोजी दिलेले सर्व प्रतिज्ञापत्र व त्यातील मजकूर खोटा व बनावट आहे.
– 24 नोव्हेंबर 2007 रोजीच्या पत्रामध्ये असे नमूद केलेले आहे की, विश्वस्त बैठकीमध्ये नवीन विश्वस्तांची नेमणूक केली जावी असा ठराव करण्यात आला. वस्तूतः असा कोणताही ठराव रानडे ट्रस्टने केलेला नाही.
– जमिनीवर नावे लावताना महसूल विभागाला खोटी कागदपत्रे व माहिती देऊन असे भासवले की, नवीन विश्वस्तांची नेमणूक होत आहे व त्यांची नोंद केली जात आहे, हे पूर्णतः खोटे आहे.
– आमचे विश्वस्त कै. डी. आर. नगरकर यांचे 1980 साली निधन झाले. महसूल विभागातील कागदपत्रांमध्ये त्यांच्या जागी चंद्रशेखर पांडुरंग घाडगे यांचे नाव घेतले जावे असे पत्र कै. काकडे यांनी 16 डिसेंबर 1986 रोजी महसूल विभागाला दिले होते. त्यानंतर दहा मार्च 1999 रोजी कै. काकडे यांचे सह तत्कालीन सर्व विश्वस्तांनी सह्या करून विनंती अर्ज केला होता. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्या विरोधात आम्ही तत्कालीन महसूल राज्यमंत्री रामराजे निंबाळकर यांना अर्ज करून महसूल विभागाच्या चुका लक्षात आणून दिल्या होत्या. महसूल राज्यमंत्री रामराजे निंबाळकर यांनी हवेलीच्या उपविभागीय अधिकार्‍यांना आमच्या पत्रावरच आदेशित केले होते. त्या आदेशावरही कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र, ज्यांचा ट्रस्टीमध्ये कोणताही संबंध नाही अशा व्यक्तींच्या नावाची नोंद अत्यंत वेगाने आणि तातडीने 8 फेब—ुवारी 2000 रोजी दाखल करून घेत 27 जुलै 2007 रोजी त्यांची नोंद सातबारावर घेण्यात आली.
– ट्रस्टच्या मालमत्तेवर करण्यात आलेले हे सर्व फेरबदल पूर्णता बेकायदेशीर आहेत, त्याविषयी संबंधितांनी भादवि 860 च्या कलम 177,182, 191,192,193, 196,197,198,199,200, 415,416,420,463,464,465,466,467,468 आणि 34 व 120ए चा भंग केला असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणात जबाब घेत प्रकरण चौकशीत ठेवले.

1986 मध्ये तत्कालीन महसूल राज्यमंत्री रामराजे निंबाळकर यांनी ट्रस्ट मालमत्तेच्या नोंदीत बदल करण्याचे आदेश दिले होते. मात्र 2007 मध्ये मिलिंद देशमुख, शिवाजी धनकवडे आणि सागर काळे यांची नावे गतीने काम करून सातबार्‍यावर नोंद घेतली, असा आरोपही सुनील भिडे यांनी केलेल्या तक्रार अर्जात केलेला आहे. हवेली महसूल अधिकार्‍यांनी केलेले हेच काम आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news