पिंपरी : पंतप्रधान आवास योजना; अर्ज करण्यास चारच दिवस | पुढारी

पिंपरी : पंतप्रधान आवास योजना; अर्ज करण्यास चारच दिवस

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी आकुर्डी (मोहननगर) व पिंपरी (उद्यमनगर) येथील गृहप्रकल्पातील 938 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहे. सोमवार (दि.24) पर्यंत एकूण 10 हजार 177 पैकी 3 हजार 455 जणांनी 10 हजार 500 रुपये भरून अर्ज केले आहेत. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि.28) पर्यंत असून, केवळ 4 दिवस शिल्लक आहेत.

मोहननगर येथील गृहप्रकल्पात एकूण 568 सदनिका आहेत. तर, उद्यमनगर येथील गृहप्रकल्पात एकूण 370 सदनिका आहेत. हे दोन्ही गृहप्रकल्प तयार आहेत. सदनिकेसाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास वर्ग (ओबीसी) व दिव्यांग असे आरक्षण आहे. मोहननगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 35 हजार 255 रुपये आणि उद्यमनगर येथील सदनिकेसाठी 7 लाख 92 हजार 699 रुपये स्वहिस्सा भरावा लागेल. त्यासाठी नागरिकांकडून 28 जूनपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली.

आतापर्यंत एकूण 10 हजार 177 नागरिकांनी ऑनलाईन अर्जासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या अर्जासोबत नागरिकांना 10 हजार रुपये अनामत रक्कम व 500 रुपये नोंदणी शुल्क ऑनलाइन भरावे लागतात. या रकमेसह उद्यमनगर येथील सदनिकांसाठी 1 हजार 358 आणि मोहननगरमधील सदनिकांसाठी 2 हजार 97 अर्ज प्राप्त झाले आहेत. 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. तसेच, अर्जदार व त्यांच्या कुटुंबांच्या नावाने देशात घर नसावे. तो शहराचा रहिवाशी असावा, अशी अट आहे.

मुदतीनंतर सोडत काढून सदनिकांचे वितरण

मोहननगर व उद्यमनगर येथील दोन गृहप्रकल्पांसाठी शहरातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर 10 हजार 177 नागरिकांनी ऑनलाईन अर्जप्रक्रिया केली आहे. तर, दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून 3 हजार 455 अर्ज प्राप्त झाले आहेत. शुक्रवारपर्यंत मुदत आहे. या मुदतीनंतर पात्र अर्जांची यादी करून त्यातून सोडत काढून सदनिकांचे वितरण करण्यात येईल, असे झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

Back to top button