पुणे रेल्वे स्थानक डायरेक्टरच्या दालनाबाहेर हाणामारी | पुढारी

पुणे रेल्वे स्थानक डायरेक्टरच्या दालनाबाहेर हाणामारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकाचे प्रमुख असलेल्या स्टेशन डायरेक्टर यांच्या दालनाबाहेर सोमवारी सायंकाळी मोठी हाणामारीची घटना घडली. ही हाणामारी भिकार्‍यांमध्ये झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, अशाप्रकारे स्थानकप्रमुखाच्या दालनाबाहेरच गोंधळ होत असल्याने स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्नसुध्दा ऐरणीवर आला आहे.

स्टेशन डायरेक्टर मदनकुमार मीना आपल्या दालनामध्ये (केबिन) बसले होते. सायंकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी त्यांना दालनाच्या काचेच्या दरवाजावर कोणीतरी धडकल्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ जागेवरून उठून दालनाबाहेर येऊन पाहिले तर 4 ते 5 जण एकमेकांशी हाणामारी करत, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. त्याची माहिती त्यांनी स्टेशन मॅनेजर सुनील ढोबळे यांना दिली. ढोबळे यांनी या घटनेच्या एमर्जन्सीची माहिती अनाऊन्सिंगद्वारे रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिस (जीआरपी) यांना दिली. या वेळी सुरक्षा यंत्रणांनी येथे लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. घटना काय घडली, ती रोखायला कोणीही आले नाही., असे ढोबळे यांनी सांगितले.

त्यानंतर सहा वाजता रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांनी स्टेशन डायरेक्टर मदनकुमार मीना यांच्या दालनात येऊन घटनेची माहिती घेतली. मात्र, अशाप्रकारे एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या दालनापर्यंत येऊन भिकारी वाद घालत असेल, तर रेल्वेची स्थानकावरील यंत्रणा काय झोपली होती का? असा प्रश्न सध्या प्रवाशांना पडला आहे.

रेल्वे स्थानकावर अधिकार्‍याच्या केबिनबाहेर अशी घटना घडली, हे चुकीचे आहे. त्यावेळी रेल्वेची यंत्रणा काय झोपली होती का? तेजस स्क्वॉड काय करतयं? पुणे रेल्वे स्थानक ’आओ जाओ घर तुम्हारा’ बनले आहे. असे लोक स्थानकात घुसतातच कसे? याकडे डीआरएम इंदु दुबे यांनी लक्ष घालून, योग्य तो बंदोबस्त करावा.

– हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

पुणे स्थानकावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला 

पुणे विभागातील दरडींचा 144 गावांना धोका

Back to top button