पुणे : अतिवृष्टीमुळे फळभाज्या कडाडल्या! किलोचा भाव शंभरी पार | पुढारी

पुणे : अतिवृष्टीमुळे फळभाज्या कडाडल्या! किलोचा भाव शंभरी पार

पुणे : राज्यासह परराज्यात बहुतांश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक रोडावली आहे. रविवारी (दि. 23) बाजारात 90 ते 95 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. बाजारातील आवकेच्या तुलनेत मागणी मोठी राहिल्याने लसूण, गवार, भेंडी, टोमॅटो, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी व भुईमूग शेंगाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, हिरवी मिरची व काकडीच्या भावात घसरण झाली.

तरकारी विभागात परराज्यांतील गुजरात, कर्नाटक येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, 2 ते 3 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, इंदौर येथुन गाजर 7 ते 8 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, 1 टेम्पो भुईमूग, 2 ते 3 टेम्पो मटार, 3 टेम्पो पावटा व मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे 7 टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 600 ते 700 गोणी, गवार व भेंडी प्रत्येकी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 2 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो सुमारे साडे पाच ते सहा क्रेट्स, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, भुईमुग शेंग 70 ते 80 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, मटार 2 टेम्पो, कांदा 70 ते 80 ट्रक, इंदौर व आग्रा भागातून बटाटा 35 ते 40 ट्रकमधून बाजारात दाखल झाला.

कोथिंबीर, मेथी, शेपू, चवळई स्वस्त

जिल्ह्यात अद्यापही पावसाने दमदार हजेरी न लावल्याने बाजारात पालेभाज्यांच्या मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची 1 लाख 75 जुडींची आवक झाली, तर मेथीची 80 हजार जुडी इतकी आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक 50 हजार तर मेथीची 45 हजार जुड्यांनी वाढली. घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात पालेभाज्या दाखल झाल्याने किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी व चवळईच्या भावात गड्डीमागे पाच तर शेपूच्या भावात पंधरा रुपयांनी घसरण झाली. उर्वरित सर्व पालेभाज्यांचे गत आठवड्यातील दर टिकून होते.

हेही वाचा

नासाचे पुढील लक्ष्य अंतराळातील कुबेराचे भांडार!

खेड : लम्पी लसीकरणास टाळाटाळ

पाथर्डी : चार वर्षांनंतर वसाव कुटुंबात ‘अमन’

Back to top button