कोल्‍हापूर : वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; शिंदेवाडी-यमगे वाहतूक बंद, गारगोटी-कूर रस्‍त्‍यावर पाणी | पुढारी

कोल्‍हापूर : वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ; शिंदेवाडी-यमगे वाहतूक बंद, गारगोटी-कूर रस्‍त्‍यावर पाणी

मुदाळतिट्टा ; पुढारी वृत्तसेवा देवगड-निपाणी रस्त्यावर मुरगुड च्या स्मशान शेडजवळ वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी दोन दिवसांपुर्वी आले आहे. त्यामुळे तेथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. याचबरोबर याच राज्य मार्गावरील यमगे- शिंदेवाडी दरम्यान रस्त्यावर वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी आले आहे. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने या ठिकाणी अंदाजे दोन फूट पाणी रस्त्यावर आल्याने पुन्हा मुरगुड निपाणी मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

गारगोटी-कोल्हापूर मार्गावर कुर मडीलगे दरम्यान रस्त्यावरून वेदगंगा नदीचे महापुराचे पाणी वाहत आहे. येथे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण सध्या कमी असल्याने वाहतूक सुरू आहे. पण पावसाचे प्रमाण वाढल्यास येथून होणारी वाहतुक पूर्णपणे बंद होणार आहे. वाघापूर ता. भुदरगड येथील बिरोबा मंदिर येथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे, पण पोलीस यंत्रणा सतर्क आहे.

सध्या मुरगुड येथून करंजीवने, हळदी, हमीदवाडा, निपाणी आणि बेलेवाडी कापशी गडहिंग्लज अशा पर्यायी मार्गाने वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू आहे.

भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सोमवार सकाळपासून मुरगुड परिसरात पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे, पण पाणी पातळी जैसे थे आहे. मुरगुडच्या स्मशान शेडजवळ रस्त्यावर तीन फूट पाणी आहे. त्यामुळे कालच्या पेक्षा आजची परिस्थिती वेगळीच आहे.

या ठिकाणी नवीन रस्त्याचे काम करत असताना पुलाचे रुंदीकरण होणे गरजेचे होते, पण रुंदीकरण न करता जुन्या पद्धतीच्या आकाराचा पुल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्या खालून घातलेल्या नळ्यांमधून पाणी निचरा होत नाही. याचा परिणाम पाणी रस्त्यावर येते. येथे रस्त्याची उंची वाढवल्यास मुरगुड शहरांमध्ये महापुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरेल, पाण्याचा फुगवटा वाढेल अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्या पद्धतीने या ठिकाणी रस्ता केला, पण पूल योग्य पद्धतीने न झाल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे. वेद गंगेचा महापौर आणि या ठिकाणी येणारे पाणी हा प्रश्न न सुटणारच असल्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी काय तोडगा काढता येतो का हे संबंधित विभागाने पाहणे गरजेचे आहे. निढोरी, मुरगुड, शिंदेवाडी येथे पूर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button