पुणे महापालिका पदभरती : कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक जाहीर | पुढारी

पुणे महापालिका पदभरती : कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या 320 पदांसाठीच्या भरती प्रक्रियेतील परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिकेने मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. पालिकेच्या वर्ग 1 ते 3 संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
यानंतर राज्यातील 5 शहरांमध्ये वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर आयबीपीएस संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, मेरिटनुसार यादी जाहीर केली आहे. मेरिटमध्ये आलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता, यासंबंधीची कागदपत्रे तपासण्यासाठी छाननी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
क्ष-किरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट), वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सीनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, व्हेईकल इन्स्पेक्टर, औषधनिर्माता या पदांच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी 27 जुलैला होणार आहे. ही छाननी जुने सभागृह व डॉ. आंबेडकर सभागृह येथे होणार आहे.
उपसंचालक (प्राणिसंग्रहालय), पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक (लाइव्ह स्टॉक सुपरवायझर) या पदांसाठी 28 जुलैला स्थायी समिती सभागृहात आणि आरोग्यनिरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टरपदासाठी 1 ऑगस्ट रोजी जुने सभागृह येथे  छाननी होणार आहे. यासाठी उमेदवारांनी स्वखर्चाने मुक्कामाच्या तयारीने यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एका पदास तीन, याप्रमाणेच उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नवीन यादीत असलेल्या उमेदवारांनीच या प्रक्रियेसाठी उपस्थित
राहायचे आहे.
– सचिन इथापे, 
उपायुक्त, पुणे महापालिका
हेही वाचा

Back to top button