पुणे : राजगडावर दरड कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली | पुढारी

पुणे : राजगडावर दरड कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

वेल्हे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पावसाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटकांची झुंबड सुरूअसलेल्या वेल्हे तालुक्यातील दुर्गम राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या कातर खडकातील पाय मार्गावर कड्याच्या मोठ्या दगडासह शनिवारी(दि.२२) पहाटे दरड कोसळली. त्यावेळी अरुंद मार्गावर पर्यटक नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ‌गेल्या दोन आठवड्यापासून राजगड परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने ठिसुळ झालेल्या कड्याच्या दगडी उन्मळून कोसळण्याचा धोका असल्याने सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाने बालेकिल्ला काही दिवस पर्यटकांना बंद केला आहे.

गडाच्या पद्मावती माचीवरील छत्रपती शिवरायांच्या राजसदरे समोरून जाणाऱ्या बालेकिल्ल्याच्या मार्गावर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी आठ ते दहा हजारांवर पर्यटकांची गडावर गर्दी असते. पहाटेच्या सुमारास बालेकिल्ल्याच्या उंच कड्याचा महाकाय दगड कोसळला. दगडाबरोबर कड्याच्या उन्मळून आलेल्या दरडीची माती, राडारोडा वाहत खाली आल्याने झाडे झुडपेही जमीनदोस्त झाली आहेत. दरडीच्या मोठ्या राड्यारोड्या खाली पायी मार्ग बुजुन गेला.

पुरातत्व विभागाचे आणि राजगडाचे पाहरेकरी बापु साबळे, पवन साखरे व सुरक्षा रक्षक आकाश कचरे सकाळी ९ वाजता गडावर आले असता त्यांना हा प्रकार दिसला‌. सकाळ पासूनच गडावर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. कोसळलेल्या दरडीवरुन काही पर्यटक बालेकिल्ल्यावर धाव घेत होते. दरडीच्या राडारोड्यात अडकून तसेच कड्याचे उन्मळून दगड कोसळत असल्याने सुरक्षेसाठी बालेकिल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली. तरीही काही हौशी पर्यटक बालेकिल्ल्यावर धाव घेत होते.

पर्यटकांना विनवण्या करत पाहरेकरी, सुरक्षा रक्षकांनी मार्गावर कोसळलेल्या दरडीचा राडारोडा, झुडपे, झाडे बाजुला करुन मार्ग मोकळा केला. मात्र, संततधारेमुळे पुन्हा माती राडारोडा वाहुन येत आहे. पुरातत्व विभागाचे पाहरेकरी बापु साबळे म्हणाले, बालेकिल्ल्याचा कड्याच्या मोठ्या दगडासह दरड कोसळल्याने शंभर फूट अंतराचा बालेकिल्ल्याच्या मार्ग गाडुन गेला होता. काही राडारोडा काढून मार्ग मोकळा केला असला तरी दरडीचा धोका कायम आहे.

कड्याची दरड कोसळल्याने बालेकिल्ल्यावर पर्यटकांना काही दिवस मनाई करण्यात आली आहे. पावसामुळे उन्मळून आलेल्या दरडी, दगड कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे .

– डॉ. विलास वाहणे, पुरातत्व विभागाचे सहसंचालक

 

खबरदारीचे आवाहन

दुर्गम राजगड, तोरणागडासह सिंहगडावर पावसाळी पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत . पायी मार्गावर तसेच घाट रस्त्यासह गडाच्या डोंगर, कड्याच्या ढिसुळ झालेल्या दरडी पावसामुळे कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे पर्यटकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुरातत्व विभागासह हवेली तसेच वेल्हे पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा:

पुणे महापालिकेकडून वर्षातील पहिल्या संशयित डेंग्यू मृत्यूची नोंद

पुणे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी चव्हाण

पुणे : स्वातंत्र्यलढ्यातील बैठकीची जागा बनवलीय उत्पन्नाचे साधन!

 

Back to top button