आळंदीत 1730 लहान मुलांना डोळ्यांचा संसर्ग | पुढारी

आळंदीत 1730 लहान मुलांना डोळ्यांचा संसर्ग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पावसाळी हवामानामुळे आळंदीत लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये 1730 मुलांमध्ये डोळे सुजणे, पाणी येणे अशी लक्षणे दिसून आली. शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण रुग्णालयात मुलांसाठी दोन नेत्रतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. सोमवारच्या तुलनेत शुक्रवारी संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. पावसाळी हवा, आर्द्रता यामुळे या दिवसांमध्ये डोळे, कान आणि त्वचेच्या संसर्गात वाढ होते. मुलांना डोळ्यांतून पाणी येणे, डोळे सुजणे, लाल होणे, वेदना होणे असा त्रास आढळून आल्यास शाळेत पाठवू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आळंदी नगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. सर्व मुलांची तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. पुढील उद्रेक टाळण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
                     – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सोमवारच्या तुलनेत शुक्रवारी संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. आळंदीत प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक आणि पालकांना मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात विशेष ओपीडी सुरू करून दोन नेत्रतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.
               – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध रुग्णाल

हेही वाचा :

फौजदार प्रेमचंद ऑन ड्युटी मद्यधुंद ! नशेत वाहनचालकांना केली शिवीगाळ

सातारा : दरीत ढकलून खून करणारे तिघे जेरबंद

Back to top button