उजनी धरणातील साठ्यात हळूहळू वाढ | पुढारी

उजनी धरणातील साठ्यात हळूहळू वाढ

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  गतवर्षी ओव्हर फ्लो (पूर्ण क्षमतेने) झालेले उजनी धरण सध्याच्या स्थितीत मायनस (उणे) 36 टक्क्यांवर पोहचले होते. मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा परिसर, घाटमाथा तसेच भीमा खोर्‍यात पडत असलेल्या पावसाने उजनी धरणातील पाणीसाठ्यात संथ गतीने का होईना; परंतु वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत उजनी धरणातील पाणीसाठा 4 टक्क्यांनी वाढला असून, आता तो उणे 32 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे.

पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांची तहान भागवणार्‍या उजनी धरणातील पाणीसाठा राज्यकर्ते व जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांच्या मनमानीपणामुळे सोलापूरकरांना पिण्याच्या नावाखाली सोडल्याने धरण तळाशी गेले होते. यामुळे पाऊस वेळेत न झाल्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. काही शेतकर्‍यांची पिके जळून गेली, तर काहींची जळण्याच्या मार्गावर होती. यामुळे येथील शेतकरी आर्थकि संकटात सापडला होता. दरम्यान, सोलापूरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे उजनी धरणाचा पाणीसाठा वाढू लागला असून, धरण मायनस 32 टक्क्यांवर आले आहे. आता उशिराने का होईना पावसाने जोर धरल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाणीसाठा वाढत असल्याने रखडलेल्या आडसाली उसाच्या लागवडी पुन्हा सुरू होतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत.

हे ही वाचा :

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; आगामी दोन दिवस कोकणात रेड अलर्ट

मणिपूर लष्कराकडे सोपवा काँग्रेसची मागणी; महिला आमदार आक्रमक

Back to top button