रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; आगामी दोन दिवस कोकणात रेड अलर्ट | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; आगामी दोन दिवस कोकणात रेड अलर्ट

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : दुसर्‍या टप्प्यातील मोसमी पावसाने आता कोकण किनारपट्टी भागात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसा उसंत घेत वाटचाल करणारा पाऊस रात्री तुफान बरसला. शुक्रवारी सकाळी जोरदार सरी कोसळल्या. पुढील दोन दिवस कोकणातील पाचही जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये गुरुवार व शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती.

पश्चिम वार्‍याचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून साडेसात किलोमीटर अंतरावर असल्याने आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी जगबुडी, शास्त्री आणि राजापूर तालुक्यातील
कोदवली नदीतील जलस्तर इशारा पातळीवर असल्याने प्रशासनाने या नद्यांच्या परिसरातील गावांत सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत चिपळूण तालुक्यात उद्भवलेली पूरस्थिती शुक्रवारी काही प्रमाणात ओसरली असून स्थिती नियंत्रणात असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. संभाव्य आपत्तीची शक्यता लक्षात घेेऊन खबरदारीच्या उपायायोजना म्हणून खेड तालुक्यातील रघुवीर घाट दळणवळणासाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.

गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर ओसरलेला होता. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी , लांजा आणि राजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी जिल्ह्यात 52.89. मि.मी .च्या सरासरीने 476 मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात 20 मि.मी., दापोली 10, खेड 36, गुहागर 18, चिपळूण 35, संगमेश्वर 92, रत्नागिरी 75, लांजा तालुक्यात 99 आणि राजापूर तालुक्यात 91 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस दापोली तालुक्यात झाला. तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात झाला आहे. पावसाने यंदा जुलैैच्या अखेरच्या टप्प्यात जोर धरला असून सरासरी दीडहजार मि.मी. ची वाटचाल सुरू केली आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस अद्यापही सरासरी 500 मि.मी. पिछाडीवर आहे.

जिल्ह्यातील पर्जन्यमान…

जिल्ह्यातील पर्जन्यमान (1 जूनपासून मि.मी. मध्ये ) ः मंडणगड 1870, दापोली 2020, खेड 1356, गुहागर 1010, चिपळूण 1524, संगमेश्वर 1353, रत्नागिरी 1102, लांजा 1523, राजापूर 1587, एकूण 13,363. सरासरी 1484. गतवर्षी – एकूण 16,287 व सरासरी 1809 मि. मी. इतका पाऊस झाला.

Back to top button