इंद्रायणी नदी सुधार योजनेचा डीपीआर अंतिम टप्प्यात

इंद्रायणी नदी सुधार योजनेचा डीपीआर अंतिम टप्प्यात

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून तयार करण्यात येत असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाच्या कामासाठी नियुक्त एजन्सीकडून 24 जुलै रोजी डीपीआर पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सादर केला जाणार आहे. पीएमआरडीएची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडे आणि त्यानंतर केंद्र सरकारकडे सादर केला जाईल.

इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. एकूण 105 किलोमीटरपैकी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे 18 किलोमीटर अंतरातील इंद्रायणी नदी सुधार योजनेचे काम पिंपरी पालिकेकडून केले जाणार आहे. तर, 87 किलोमीटर अंतरातील काम पीएमआरडीए करणार आहे. इंद्रायणी नदीपात्राचे ड्रोनद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्टील फोटोग्राफीचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. या सर्वेक्षणात नदीपात्र, नदीत मिसळणारे नाले, ओढे अशा विविध बाबींची पाहणी करण्यात आली. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे.

प्रकल्पामुळे होणारा फायदा

आळंदी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी इंद्रायणी नदी हा मुख्य स्त्रोत आहे. कार्ला, चाकण एमआयडीसी भागात इंद्रायणी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. ते नियंत्रणात येईल. दोन्ही तिरांवरील 55 गावे आणि शहरांतून निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून नदी प्रदूषण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

शासनाकडून निधी मिळणार

इंद्रायणी नदी कुरवंडे या गावापासून उगम पावते. सुमारे 105 किलोमीटर लांबीचा प्रवास करून नदीचा तुळापूर येथे संगम होतो. केंद्र व राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी भांडवली किमतीच्या 60ः40 टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. पूर नियंत्रण व नदीतीराचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

इंद्रायणी नदी सुधार योजनेच्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे येत्या 24 जुलै रोजी हा अहवाल नियुक्त एजन्सीकडून सादर केला जाईल.

– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news