खरवंडी कासार चौकीत सशस्त्र पोलिस नेमा; काशीबाई गोल्हार | पुढारी

खरवंडी कासार चौकीत सशस्त्र पोलिस नेमा; काशीबाई गोल्हार

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खरवंडी कासार येथील पोलिस चौकीत कायमस्वरूपी सशस्त्र पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, तसेच नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशिबाई गोल्हार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील खखंडी कासार हे बीड जिल्ह्याच्या सरहदीवर असून, बाजारपेठेचे गाव आहे.

हा परिसर अत्यंत दुर्गम आहे. या ठिकाणी चोर्‍या करून गुन्हेगार बीड जिल्ह्यात पळ काढतात. गावात पोलिस चौकी असून, सशस्त्र पोलिसांची नियुक्ती करावी, खरवंडी कासार येथे आठ दिवसांपूर्वी रात्री डॉ. घुले यांच्या घरावर दरोडा पडला होता. तसेच दोन दिवसा पूर्वी मुख्य बाजारपेठेत तीन घरांचे दरवाजे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे पळून गेले. वारंवार घडत असलेल्या घटनांमुळे जनतेत घबराट पसरली आहे.

त्यामुळे येथील पोलिस चौकीत कायम स्वरूपी सशस्त्र पोलिस कर्मचार्याची नेमणूक करावी, तसेच नवीन पोलिस ठाणेनिर्मितीसाठी तातडीने प्रयत्न करावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी खरवंडी कासारचे सरपंच प्रदीप पाटील, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, वृद्धेश्वर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार, भाजयुमोचे पाथर्डी तालुका उपाध्यक्ष महेश बोरुडे, सुषमा शिवगजे, शामल कटारिया, द्वारका जगताप, शकुंतला आव्हाड, सीमा सांगळे, मनीषा अंदुरे, मोहिनी लोंदे, कांताबाई बुगे, रुक्मिणी शिवगजे, मनीषा शिवगजे, सुवर्णा चिंतामणी उपस्थित होत्या.

योग्य कारवाईचे आश्वासन

यावेळी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी खरवंडी कासारला लवकरच भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

हेही वाचा

नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, ३६ मंडळात अतिवृष्टी, अनेक गावांचा संपर्क तुटला

महत्त्वाची बातमी ! वरंधा घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीकरिता बंद

अर्जुन चौथ्यांदा झाला पिता, गॅब्रीएलाने दुसऱ्यांदा दिला मुलाला जन्म

Back to top button