भोर तालुक्यातील पाच गावे धोक्याच्या छायेत ; अर्धवट  कामे झाल्याने नागरिकांच्या जीविताला धोका | पुढारी

भोर तालुक्यातील पाच गावे धोक्याच्या छायेत ; अर्धवट  कामे झाल्याने नागरिकांच्या जीविताला धोका

अर्जुन खोपडे:
भोर : भोर तालुक्यातील डेहेण,  सोनारवाडी, धानवली, जांभुळवाडी आणि कोंढरी ही गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. यामधील काही गावांचे पुनर्वसन प्रस्ताव  मंजुरीअभावी रखडले आहेत.
तालुक्यातील वेळवंड खोर्‍यातील डेहेण आणि सोनारवाडी, निरा देवघर धरणभागातील धानवली, आंबवडे खोऱ्यातील जांभुळवाडी आणि हिरडस मावळ खोर्‍यातील कोंढरी  गावांचा यामध्ये समावेश आहे. ही पाच गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे.  शासनाने अतिवृष्टीच्या छायेत असणार्‍या गावांना  ठरावीक निधी मंजूर केला होता. यातून ओढे खोल व रुंद करून डोंगराचे पाणी वळविणे व डोंगराला दगडाची ताल रचून जाळी लावणे, यात काँक्रीट व गॅबियन बंधारे, अशी कामे करणे गरजेचे होते.
मात्र, काही कामे अर्धवट, तर काही पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात हायरिस्क गावात धोका होऊ शकतो. मात्र, याकडे प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. निरा देवघर धरणभागातील रिंगरोडपासून चार किलोमीटर आत रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागून धानवली हे 400 लोकवस्तीचे महादेव कोळी समाजाचे गाव आहे. या गावातील काही कुटुंबांचे डोंगरातून खाली दोन किलोमीटर सपाटावर पुनर्वसन केले आहे. मात्र, अजूनही काही कुटुंबे तेथेच आहेत. पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून डोंगरातील कड्याखालीच राहत हे नागरिक कायमच वंचित आहेत.
त्यामुळे अतिवृष्टीमध्ये  डोंगरातील दगडमाती पडून घरांची पडझड होऊ शकते किंवा जीवितहानी होण्याची भीती आहे. येथील लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. अशीच अवस्था रायरेश्वर किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावरील कोर्ले गावांतर्गत असलेल्या जांभुळवाडी येथील आहे. रायरेश्वराच्या डोंगराखाली ही 500 लोकांची वाडी असून, पावसाळ्यात येथील घरांनाही धोका होऊ शकतो. हिरडस मावळ खोर्‍यात अतिवृष्टीचा फटका कोंढरी गावाला मागील तीन वर्षांपूर्वी  बसला असताना या गावचे पुनर्वसन  करण्याचा प्रस्ताव मंजुरीअभावी शासनदरबारी
रखडलेला आहे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत राज्य सरकार किती गांभीर्याने वागत असल्याचे यातून दिसत असताना माझ्या भोर मतदारसंघातील धानवली, कोंढरी व मुळशी तालुक्यातील घुटके  या गावांच्या पुनर्वसनाचे  प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात गेल्या आठ महिन्यांपासून मंजुरीअभावी पडून आहेत. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत असूनदेखील  त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 
                                                                     – आ. संग्राम थोपटे, भोर विधानसभा मतदारसंघ 
हे ही वाचा : 

Back to top button