पिंपरी : शाळेजवळ तंबाखू, सिगारेट विक्री करणार्या टपर्यांवर कारवाई

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शाळा व महाविद्यालयांजवळ तंबाखू, गुटखा व सिगारेटची विक्री करणार्या टपर्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथक व पोलिसांच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. शहरातील 72 शाळेच्या 100 मीटर आवारातील टपर्या हटविल्या. तर, 325 गुन्हे दाखल केले आहेत. शाळेजवळची टपरी, चहा विक्रीची ठिकाणे, पत्राशेड, खासगी जागा, बंदिस्त गाळे, भाजी विक्री केंद्र आदींची तपासणी करण्यात आली. संशयास्पद वाटलेल्या विक्रेत्यांना नोटीस बजावून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
शाळेच्या 100 मीटर परिघात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 4 आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील 8 विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या. तसेच, 4 विक्रेत्यांच्या टपर्या हटविल्या. आयुक्त शेखर सिंग म्हणाले, शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, ‘नागरिकांनी या कारवाई मोहिमेत सहभाग घेऊन शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास पालिकेच्या शिक्षण विभागास तसेच, संबंधित अधिकार्यांना तात्काळ माहिती द्यावी.’
कारवाई सातत्याने सुरू राहणार
अंमली पदार्थविरोधी पोलिस पथक आणि पालिकेच्या पथकाने शहरातील विविध भागातील शैक्षणिक संस्थांच्या परिसराची संयुक्त पाहणी केली. सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. एकूण 325 गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचे कोणतेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
हेही वाचा
वसंतदादा बँक : थकबाकी 333 कोटींची तरीही नोंदणी रद्दचा प्रयत्न
इर्शाळवाडी दुर्घटना : मदतीसाठी ओघ सुरु, आपत्तीग्रस्तांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा