

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला फिफा विश्वचषक स्पर्धेला गुरुवारपासून (दि.20) सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे यजमान पद न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश संयुक्तरित्या भूषवत आहेत. पहिला सामना यजमान न्यूझीलंड आणि नॉर्वे यांच्यात होणार असून या सामन्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑकलंडमध्ये ज्या अमेरिकन संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते त्याच हॉटेलजवळ अचानक गोळीबार झाला. या हल्ल्यात दोन जणांसह एक हल्लेखोर ठार झाला. तर पोलिसांसह 6 जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी याघटनेबाबत शोक व्यक्त केला असून गुरुवारी महिला फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यास विलंब होणार नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ऑकलंडमधील गोळीबारीची घटना दुर्दैवी आहे. मात्र, हा राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्याशी निगडीत विषय नसून स्पर्धेच्या नियोजनानुसारच उद्घाटनचा सामना सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, ऑकलंडमधील ईडन पार्क येथे गुरुवारी सकाळी एका माथेफिरुने गोळीबार केला. हल्लेखोर बंदूक घेऊन अचानक रस्त्यावर आला होता. त्यानंतर त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. हल्लेखोराने अनेक राउंड फायर केले. ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनास्थळी सुरक्षेसाठी तैनात असणा-या पोलिसांनी हल्लेखोराच्य गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिले. ज्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेला धाडसाने सामोरे जाणा-या सर्व पोलिस कर्मचा-यांचे न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कौतुक करत आभार मानले आहेत.
ऑकलंड शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या घटनेनंतर खळबळ माजली. खेळाडूंच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, न्यूझीलंड सरकारने एक निवेदन जारी करत वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला फुटबॉलपटूंना धोका उद्भवलेला नाही. सर्व संघांचे खेळाडू आणि कर्मचारी सुरक्षित आहेत, असा खुलासा करण्यात आला आहे.