बिबट्यांची नसबंदी होणार ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश | पुढारी

बिबट्यांची नसबंदी होणार ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्यासाठी देशात प्रयोग झाले असल्यास त्याचा अभ्यास करण्यात येईल. बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच बिबट्यांची नसबंदी कार्यप्रणाली तयार करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मुंबई विधानभवनात मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील काही गावांमध्ये बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर या विषयावर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री जयंत पाटील, अशोक पवार, अतुल बेनके, सुनील प्रभू, अनिल बाबर, आशिष जयस्वाल, मानसिंग नाईक, दिलीपराव बनकर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, बिबट्या पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिंजरा लावण्यात येईल. शहर किंवा गावात शिरण्याचा प्रयत्न करणार्‍या बिबट्याला पकडण्यासाठी परवानगी लागते. त्याला विलंब होऊ नये म्हणून ऑनलाइन परवानगीची व्यवस्था करण्यात येईल. पिंजर्‍यांची संख्या वाढविण्यात येणार असून, ते अत्याधुनिक असतील, असे आश्वासन त्यांनी दिले. वन्यजीव संवर्धन करताना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानभरपाईची रक्कम 30 दिवसांच्या आत देण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल. बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्यासाठी प्रयोग झाले असल्यास त्याचा अभ्यास करण्यात येईल.

हे ही वाचा : 

नाशिक : ठेकेदारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित

पुणे : सर्व डायलिसिस मशीन सुरू करण्याची महापालिकेकडून तंबी

Back to top button