यू-ट्यूबच्या मदतीने विद्यार्थी गिरवणार धडे ! | पुढारी

यू-ट्यूबच्या मदतीने विद्यार्थी गिरवणार धडे !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा नियोजन आणि विकास समितीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसाठी 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जिल्हा परिषदेने आता प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ई-साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. कार्टून स्वरूपातून शालेय शिक्षणाचे ई-साहित्य यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये ई-लर्निंगबरोबर आता यूट्यूबचा शिक्षणासाठी वापर करण्यात येणार आहे.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करून कोरोना काळात शैक्षणिक नुकसान भरून काढणे तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. ’लहान मुलांमध्ये कार्टून पाहण्यासाठी मोबाईलमध्ये यूट्यूबचा वापर केला जातो. त्यातून त्यांचे मनोरंजन होते. आता त्याच यूट्यूबच्या माध्यमातून कार्टूनऐवजी शालेय शिक्षणाशी निगडीत गोष्टी कार्टून स्वरूपात पाहून ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न आहे. शैक्षणिक उपक्रम यूट्यूबच्या माध्यमातून पाहिल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. पालकांनीदेखील मुलांना कार्टून पाहण्यासाठी यूट्यूब देण्याऐवजी शैक्षणिक उपक्रम, ज्ञानाची माहिती देणारे कार्टून खुले करून द्यावेत. ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना आकलनापेक्षा दृकश्राव्य आकलन सुधारण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये ई लर्निंग पद्धतीने शिक्षण सुरू केले जाणार असल्याचे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. शिक्षकांना पुरस्कार देताना त्यांची गुणवत्ता तपासूनच पुरस्कार दिले जाणार आहेत, कुणाच्या शिफारशीने पुरस्कार दिले जाणार नाहीत. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्ह्यात ‘एक गाव, एक शाळा’ असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले.

राजकीय कार्यक्रमांची अंमलबजावणी बंद
जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये अनेकदा राजकीय नेते मंडळी येऊन विविध कार्यक्रम घेतात. तसेच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये विविध प्रकारच्या मोहिमा, उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये शिक्षकांना सहभागी करून त्यांच्यामार्फत ते राबविले जातात. शाळेच्या शैक्षणिक अध्ययनाला सुटीच दिली जाते. त्यामुळे शाळांमध्ये या पुढे कोणतेही शैक्षणिक उपक्रमाव्यतिरिक्त राजकीय कार्यक्रमांची अंमलबजावणी होणार नाही, असे ही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा :

पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या दुर्गम भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

ह्दयद्रावक! कोल्हापूरमध्‍ये दुचाकीला अपघात, आईसमोरच बालिकेचा अंत

Back to top button