पुण्याचा रिंगरोड गतिमान ; 14 शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे 14 कोटींचे धनादेश प्रदान | पुढारी

पुण्याचा रिंगरोड गतिमान ; 14 शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे 14 कोटींचे धनादेश प्रदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला प्रस्तावित पुणे चक्राकार महामार्ग रिंगरोड प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाच्या गतिमान कार्यवाहीमुळे वेग आला आहे. आज या प्रकल्पासाठी संमती करारनाम्याद्वारे जमीन दिलेल्या 14 शेतकर्‍यांना भूसंपादनाच्या मोबदल्याचे सुमारे 13 कोटी 82 लाख 90 हजार रुपये इतक्या रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, अपर जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, भूसंपादन (समन्वय) उपजिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अजित पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, आजचा दिवस पुणे जिल्ह्यासाठी, राज्यासाठी महत्त्वाचा आहे. एक प्रकारे खर्‍या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आज सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुण्यामध्ये वाहतूक कोंडीचा सर्वांनाच त्रास होतो. त्यावर मात करण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. संमती करारनाम्याद्वारे प्रकल्पासाठी जमीन देणार्‍यांना एकूण मोबदल्याच्या 25 टक्के अतिरिक्त वाढीव मोबदला दिला जात आहे. शासनाने सुमारे 1 हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी दिले असून, त्यामुळे संमती करारनामे करणार्‍या शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला देणे शक्य होत आहे. जसजशी अधिक शेतकर्‍यांची संमती मिळेल तसे शासनाकडून अधिकचा निधी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

मिलिंद शेलार म्हणाले, मौजे ऊर्से रिंग रोडच्या संदर्भात अतिशय चांगला, आम्ही अपेक्षाही केली नव्हती इतका मोबदला मिळाला आहे. आम्ही स्वत:हून सहमती दिल्यामुळे 25 टक्के अधिक मोबदला मिळाला आहे. आम्ही या पैशाचे चांगले नियोजन करणार आहोत. सर्वांनीच संमती देऊन अधिकचा मोबदला मिळवावा.

पैशाचे योग्य नियोजन करा
भूसंपादनातून मिळालेल्या पैशाचे योग्य नियोजन करण्याचा सल्लाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शेतकर्‍यांना दिला. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या रकमेचा भविष्यासाठी चांगल्याप्रकारे उपयोग करा, शाश्वत गुंतवणूक करा, अनावश्यक बाबींवर खर्च करू नका, असेही ते म्हणाले. रकमेच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या पर्यायांची माहिती खातेदारांना होण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

शेतकर्‍यांकडून समाधान
या प्रकल्पाला जमीन दिल्याबद्दल मिळालेल्या मोबदल्यावर शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त करून प्रकल्पाला भविष्यातही पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. रामचंद्र रघुनाथ चव्हाण, मौजे कल्याण (ता. हवेली) अधिकार्‍यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. अडचणी सोडविण्यासाठी तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत सर्वांनीच सहकार्य केले. शासन ज्या-ज्या योजना करत आहे त्या लोकांसाठीच करत आहे. त्यामध्ये सहभाग देता आला याचा आनंद आहे. दिलेल्या मोबदल्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. त्याचा योग्य उपयोग, पुनर्गुंतवणूक चांगल्याप्रकारे करण्यासाठी प्रयत्न करू.

हेही वाचा :

पुणे : थिटेवाडी धरण कोरडे पडले

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा पाणीपातळीत पाच फुटाने वाढ | Krishna-Panchganga water level

Back to top button