एटीएम फोडले आम्ही नाही पाहिले ! चोरीचा ना बँकेला, ना सुरक्षा कंपनीला थांगपत्ता | पुढारी

एटीएम फोडले आम्ही नाही पाहिले ! चोरीचा ना बँकेला, ना सुरक्षा कंपनीला थांगपत्ता

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चोरट्यांनी गॅसकटर आणि लोखंडी रॉडच्या साह्याने शहरातील गर्दीने गजबजलेल्या रस्त्यावरील एका नामांकित बँकेचे एटीएम मशिन फोडले. त्यानंतर त्यातील 13 लाख 34 हजार 200 रुपये चोरून नेले. सर्वांत गंभीर प्रकार म्हणजे, तब्बल 5 दिवस या चोरीचा ना बँकेला थांगपत्ता होता, ना सुरक्षा कंपनीला. बँकेचा कारभार किती भोंगळ असू शकतो, याचा हा नमुना समोर आला आहे.
फडके हौद चौकात असलेल्या एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरबाबत हा प्रकार घडला आहे. याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात बँकेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम सेंटरमध्ये कॅमेरे असतात. कोणी त्या मशिनला हात लावला तर सायरन वाजतो, असे सांगितले जाते. पण, लाखो रुपये असलेल्या या मशिनच्या सुरक्षेबाबत बँका किती निष्काळजी असतात, याचा प्रत्यय फडके हौद चौकातील एटीएम सेंटरबाबत आला. चोरट्यांनी हे एटीएम कधी फोडले, हे कोणालाच माहिती नाही. बँकेच्या अधिकार्‍यांना ही गोष्ट सांगण्यात आली. पण, या एटीएममधून चोरट्यांनी किती रक्कम लांबविली, याची काहीही माहिती बँक अधिकार्‍यांकडे नव्हती. शनिवार असल्याने त्यांनी सुटी असल्याचे सांगत विषय टाळला. त्यानंतर सोमवारी बँका सुरू झाल्यानंतर त्यांनी व्यवहार तपासले. तेव्हा चोरट्यांनी तब्बल 13 लाख 34 हजार 200 रुपये चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास फरासखाना पोलिस करीत आहेत.

सीसीटीव्ही, सायरन यंत्रणा महिन्यापासून बंद
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले की, या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या एक महिन्यापासून बंद होते. सेंटरमधील सायरन सिस्टिमही बंद होती. गर्दीच्या ठिकाणी हे सेंटर असूनही तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. या सेंटरमधील मशिनमध्ये 10 जुलैला पैसे भरण्यात आले होते. त्यानंतर पुढील 5 दिवस कोणाचेही त्याकडे लक्ष नव्हते. नेहमीप्रमाणे 15 जुलै रोजी पैसे भरणारी व्हॅन तेथे आली. तेव्हा ते एटीएम मशिन गॅसकटर व लोखंडी रॉडच्या साहाय्याने फोडून आतील सर्व रक्कम चोरून नेण्यात आल्याचे दिसून आले.

हे ही वाचा :

घाटमाथ्याला आज रेड अलर्ट ; पुणे शहरात संततधारेचा इशारा

opposition meet : आमची लढाई दडपशाही विरोधात : राहुल गांधी

Back to top button