’चांद्रयान-3’मध्ये पुण्यातील कंपनीचा कॅपेसिटर
पुणे : 'चांद्रयान-3'मध्ये पुणे शहरातील सीटीआर या कंपनीने तयार केलेले प्लास्टिक कोटेड कॅपेसिटर वापरले आहेत. ही कंपनी 75 वर्षे जुनी असून, जागतिक दर्जाचे कॅपेसिटर तयार करते. या कॅपेसिटरवर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. 'इस्रो'ने 'चांद्रयान-3' तयार करताना मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारत यावर भर दिला आहे. हे यान पूर्णतः भारतीय बनावटीचे आहे. तब्बल पाचशे भारतीय उद्योजकांकडून यानासाठी लागणारे सुटे भाग यात वापरण्यात आले आहेत. यात पुणे शहरात नगर रोडवर असणार्या सीटीआर या कंपनीने तयार केलेले प्लास्टिक कोटेड कॅपेसिटर वापरले आहेत.
सीटीआरला 75 वर्षांची परंपरा…
पुणे शहरात गेल्या 75 वर्षांपासून सीटीआर कंपनी असून, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथेही कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. 1946 मध्ये प्रताप कुमार यांनी ही कंपनी स्थापन केली. त्यांचे पुत्र अनिल कुमार यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा मोठा विस्तार झाला असून, अनेक उत्पादने जगभरात निर्यात होतात. ती भारतातील पहिली ट्रान्सफॉर्मर तयार करणारी कंपनी आहे. यातील प्लास्टिक कोटेड कॅपेसिटर गेल्या अनेक वर्षांपासून 'इस्रो' वापरत आहे. प्रत्येक यानात, उपग्रहात ही कॅपेसिटर वापरली जातात.
काय आहे कॅपेसिटर?
कॅपेसिटर हे उपकरण दोन जवळच्या अंतरावरील पृष्ठभागांवर विद्युत शुल्क जमा करून विद्युत ऊर्जा साठवते. सीटीआर ही कंपनी पॉलिप्रॉपिलीन कोटेड कॅपेसिटर तयार करते. यानातील गुंतागुंतीच्या सर्कटिमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मोठ्या प्रकारचा विद्युत भार ते सहन करते व विद्युतभारातील विकृती कमी करते.
आम्ही गेल्या 75 वर्षांपासून कॅपेसिटर, ट्रान्सफॉर्मरसारखी उत्पादने तयार करतो. 'इस्रो' ही संस्था आमची काही उत्पादने यान व उपग्रह तयार करताना वापरते. यात प्लास्टिक कोटेड कॅपेसिटरचा जास्त वापर आहे. या कॅपेसिटरवर कोणत्याही प्रकारच्या हवामानाचा विपरीत परिणाम होत नाही, हे याचे
वैशिष्ट्य आहे.
– अनिल कुमार, उपाध्यक्ष, सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, पुणे
हे ही वाचा :

