पुनावळेतील जागेच्या बदल्यात चंद्रपूरची जागा महापालिका वन विभागास देणार | पुढारी

पुनावळेतील जागेच्या बदल्यात चंद्रपूरची जागा महापालिका वन विभागास देणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कचरा डेपोसाठी आरक्षित करण्यात आलेली पुनावळे येथील 22.8 हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या जागेच्या बदल्यात राज्य शासनाच्या वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील जागा देण्यात येणार आहे. त्यानुसार पालिकेने चंद्रपूर जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव पाठविला आहे. ती जागा खरेदी करून वन विभागास देण्यात येणार आहे. शहरात सध्या दररोज 1 हजार 100 टन ओला व सुका कचरा जमा होतो. तो कचरा 81 एकर परिसराती मोशी कचरा डेपोत नेऊन टाकला जातो. ओल्या कचर्‍यापासून खत निर्माण केले जात असून, सुका कचर्‍यापासून वीज निर्मिती केली जात आहे. तर, प्लास्टिक कचर्‍यापासून इंधन निर्मिती केली जात आहे.

मोशी कचरा डेपोत सन 1991 पासून कचरा आणून टाकला जात आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचून अनेक डोंगर तयार झाले आहे. ते हटविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून बायोमॉनिंग प्रकल्प दोन टप्प्यात राबविला जात आहे. झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील भविष्याची गरज ओळखून पुनावळे येथे कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले आहे. तेथील 26 हेक्टर जागा कचरा डेपोसाठी सन 2008 मध्ये मंजूर करण्यात आली आहे. अद्याप जागा ताब्यात घेण्यास पालिकेस यश आलेले नाही.
त्या 22.8 हेक्टर जागेच्या बदल्यास पालिकेने मुळशी तालुक्यातील पिंपरी येथील जागा वन विभागास देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र तेथे मोठ्या प्रमाणात मुरूम असल्याचे कारण देत ती जागा नाकारली होती. आता चंद्रपूर येथील जागा वन विभागाने सुचविली आहे. जागा शोधण्यास पालिकेने सुरूवात केली असून, तेथील जिल्हाधिकार्‍यांसमवेत पत्रव्यवहार केला जात आहे. या संदर्भात पालिकेच्या अधिकार्‍यांनी नुकताच चंद्रपूरचा दौरा केला आहे, अशी माहिती पालिकेच्या नगर रचना विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

हे ही वाचा : 

आमदार यशवंत माने यांच्यावर तालिका अध्यक्षांची महत्वपूर्ण जबाबदारी

पुणे : गुन्हेगारांचे ‘ऑपरेशन परिवर्तन’; 41 जणांना कौशल्य विकासाचे धडे

Back to top button