आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशात डिमांड ! | पुढारी

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशात डिमांड !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  परदेशात नोकरी म्हटलं की केवळ वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संधी, असेच चित्र सर्रास पाहायला मिळायचे. परंतु आता मात्र कौशल्य शिक्षणाच्या जोरावर आयटीआयच्या विद्यार्थ्यांनादेखील परदेशात नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांत आयटीआयच्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे परदेशात नोकरीची विद्यार्थ्यांनी मानसिकता तयार करणे गरजेचे असल्याचे मत कौशल्य शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
भारतात कौशल्य शिक्षणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. कारण परदेशात सध्या कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची वानवा आहे. केरळ राज्यात प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती परदेशात नोकरी करते. हाच केरळ पॅटर्न आता महाराष्ट्राने अवलंबणे गरजेचे आहे. त्यासाठी परदेशात मागणी असलेल्या हेल्थ सेक्टर, बांधकाम,अ‍ॅटोमोबाईल,मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रातील मनुष्यबळ तयार केले, तर भारतात मिळणार्‍या पगारापेक्षा कितीतरी अधिक पगार परदेशात मिळेल.
औंध आयटीआयमध्ये जवळपास 33 ट्रेड आहेत. यातील अनेक ट्रेडच्या विद्यार्थ्यांना परदेशात मागणी आहे. संबंधित ट्रेडच्या माध्यमातून भारतापेक्षाही परदेशात विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करावा.
                                                                  – आर.बी.भावसार,  उपसंचालक, आयटीआय, औंध 
 युरोपात सध्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना   
 प्रचंड मागणी आहे. युरोपात सध्या तरुण वर्ग कमी आहे. तर, भारतात तो सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात आवश्यक असलेले कौशल्य शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळतील.
                                                                – पी.एस.वाघ, आंतरराष्ट्रीय आयटीआय समुपदेशक
कशी होते निवड…
भारत सरकारच्या कौशल्य विकास मिशन अंतर्गत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात एनएसडीसीद्वारा आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, एजन्सीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येऊन त्यांना परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
कोणत्या ट्रेडला आहे परदेशात मागणी ?
फीटर, वेल्डर, वायरमन, कारपेंटर, प्लंबर, पेंटर, इलेक्ट्रिशयन, टर्नर, मशिनिस्ट, मोटर व्हेईकल मॅकनिक, डिझेल मॅकनिक, टूल अ‍ॅण्ड डायमेकर यांसह अन्य ट्रेडला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर बांधकाम, अ‍ॅटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग आदी क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी आहेत.
हेही वाचा :

Back to top button