पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील हडपसर परिसरातील जनसंपर्क कार्यालयातील बाथरूमची तोडफोड आणि आतमध्ये ऑईलपेंट टाकून आवारात उभी असलेली स्पोर्ट्स सायकल जाळण्याचा प्रकार रविवारी (दि.16) पहाटे तीनच्या सुमारास घडला. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील महादेव पाटील (वय 29, रा. पुरंदर कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार रोहित पवार यांचे हडपसर येथील भोसले गार्डनजवळील चिनार हॉटेल सृजन हाऊस येथे जनसंपर्क कार्यालय आहे. ते बंद असताना रविवारी पहाटे तीनच्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीररीत्या इमारतीच्या परिसरात प्रवेश करून त्यांनी स्पोर्ट्स सायकलवर ऑईलपेंट टाकून ती सायकल जाळून टाकली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केली असता तीन जण सृजन हाऊसच्या कंपाउंडवरून उड्या मारून कारमध्ये पळून जाताना दिसले. दरम्यान, अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून, त्यांनी ही सायकल का जाळली ? याचा सध्या शोध घेतला जात असल्याचे हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
तक्रारदार हे सृजन हाऊस या इमारतीचे सुपरवायझर तसेच सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहतात. प्राथमिक तपासात तक्रारदार आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचे दिसत आहे.
– रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त, पुणे.माझी वैयक्तिक कोणाशीही दुश्मनी नाही. हा प्रकार कार्यालयाच्या आवारातच घडला असून, तिथे उभी असलेली सायकल जाळण्यात आली आहे. तसेच कार्यालयाच्या बाथरूमच्या खिडक्यादेखील फोडल्या गेल्या आहेत.
– सुनील पाटील, फिर्यादी.
हे ही वाचा :