पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या जनतेने 54 टक्के गुन्हेगारांना नेता म्हणून निवडले आहे. या पलीकडे जाऊन 2004 पासून निवडून आलेल्या आमदार, खासदारांपैकी 4222 लोकप्रतिनिधींवर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची संपत्तीही दिवसेंदिवस वाढत असल्याची धक्कादायक माहिती 'एडीआर'चे संस्थापक सदस्य व गोखले इन्स्टिट्युटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वच पक्षांकडून उमेदवारी
सर्वेक्षणानुसार कोणत्या पक्षाने किती गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकिटे दिली, याचाही तपशील सर्वेक्षणात देण्यात आला आहे. त्यानुसार सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचे दिसते.
निवडणुका असल्या की मतदार नेत्यापेक्षा दुसरीकडेच लक्ष देतो. मागील 20 वर्षांपासून महाराष्ट्रातील मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनाच पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रातील मतदाराने विधानसभा आणि लोकसभेत पाठवलेल्या 1326 आमदार, खासदारांपैकी 715 व्यक्ती (54 टक्के) गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. एवढेच नाही, तर या सर्व खासदार, आमदारांकडे सरासरी साडेबारा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थांनी गेल्या वीस वर्षांमधील लोकप्रतिनिधी तसेच उमेदवारांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये दिलेल्या संपत्ती आणि गुन्ह्यांचा तपशिलाचा अभ्यास करून त्याचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात काही धक्कादायक बाब उघडकीस आल्या असून, 2004 पासून महाराष्ट्राच्या जनतेने 54 टक्के गुन्हेगार पार्श्वभूमीच्या व्यक्तींना आपला नेता निवडला आहे. गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आमदार, खासदारांकडे सरासरी 14.79 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
हेही वाचा :