राहुल हातोले :
पिंपरी : पुण्यावरून पिंपरीला जाणारी साडेआठ वाजताची लोकल आज रद्द केली आहे, अशी लोकलबाबतची अनाउन्समेंट आता रेल्वे स्थानकामध्ये अनाउन्सर नसल्याने प्रवाशांना ऐकायला मिळत नाही. त्यामुळे प्रवाशी नेहमीप्रमाणे स्थानकावर येऊन बसतात. लोकल, एक्सप्रेस वेळेवर आहे की उशिरा आहे, हे समजत नाही. याबाबतची आगाऊ माहिती मिळत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचा संताप स्थानकामधील तिकीट गृहातील कर्मचार्यांवरच निघत आहे.
2017-18 नंतर रेल्वे विभागाने लोकल स्थानकावरील अनाउन्सरच्या जागा भरणे बंद केले.
त्यानंतर पीपीपी तत्त्वाचा अवलंब करून रेल्वेच्या स्थानकात आपापल्या साधनांची जाहिरात करायची आणि सोबत अनाउन्सरसाठी कर्मचार्यांची नेमणूक करायची, असे ठरले. त्यानुसार, तीन ते चार वर्ष हा उपक्रम सुरू होता. मात्र, गेल्या एक ते दीड वर्षापासून शहरातील शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, आकुर्डीसह लोणावळ्यपर्यंत अनाउन्सर नसल्याने रेल्वेच्या वेळापत्रकात झालेला बदल प्रवाशांना कळत नसल्याने त्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येक लोकल स्थानकात लाखो रुपयांच्या अनाउन्सिंग मशीन उपलब्ध आहेत. या मशीनचा वापर करण्यासाठी कर्मचारी नसल्याने या मशीन वापराविना धूळखात पडून आहे. अनाउन्सिंगसाठी कर्मचारी नसल्याने बर्याचदा स्टेशन मास्तर स्थानकातील मशीनचा वापर करीत होते. तसेच, अनाउन्समेंट करीत होते. मात्र आता बर्याच लोकल स्थानकांमध्ये स्टेशन मास्तर नसल्याने रेल्वेच्या वेळांचे अनाउन्समेंट होत नाही.
कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वाद
रेल्वे एक्सप्रेस किंवा लोकल उशिरा आहे की रद्द झाली आहे, याबाबत तिकीट गृहाजवळ सूचना लिहिल्या जातात. बरेच प्रवासी पासधारक असल्याने तिकीट गृहाकडे न जाता, फलाटावर जातात. परिणामी लोकलबाबतची माहिती घेण्यासाठी गेले असता, कामाच्या गडबडीत प्रत्येकाला उत्तर देणे शक्य होत नाही. पर्यायाने प्रवाशी आणि कर्मचार्यांमध्येे वादाच्या घटना घडत आहेत. 26 ते 29 जूनपर्यंत काही लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करीत रेल्वे कर्मचार्यांशी वाद घातला होता.
कर्मचार्यांची दमछाक
एक्सप्रेस किंवा लोकलबाबत अनाउन्समेंट होत नसल्याने प्रवासी विचारणा करण्यासाठी तिकीट गृहाजवळ गर्दी करतात. मात्र त्याचवेळी दुसर्या रांगेत तिकिटासाठी प्रवासी गर्दी करतात. त्यामुळे एकीकडे तिकीट देताना दुसरीकडे ट्रेनबाबत माहिती देताना कर्मचार्यांची चांगलीच दमछाक होते.
हेही वाचा :