शिक्रापूर : 53 लाखांची फसवणूक करणार्‍यास दिल्लीत अटक

शिक्रापूर : 53 लाखांची फसवणूक करणार्‍यास दिल्लीत अटक

तळेगाव ढमढेरे /शिक्रापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील माजी उपसरपंच राहुल पवार यांना वाईन शॉपचा परवाना काढून देतो, असे म्हणून त्याच्याकडून तब्बल 53 लाख रुपये उकळले. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट पत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली. आरोपीने अनेक लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

उत्कर्ष मारुती सातकर (रा. सातकरवाडी, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल अनिल पवार (वय 32, रा. शेरीवस्ती, रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी उपसरपंच राहुल पवार यांना वाईन शॉपीचा परवाना हवा होता. सन 2023 मध्ये उत्कर्ष सातकर याचच्याशी राहुल यांची ओळख झाली होती. उत्कर्षसह त्याच्या आई व पत्नीने राहुलसोबत सणसवाडीत येथे चर्चा करत जिल्हाधिकार्‍यांना 20 लाख रुपये द्यावे लागतील. 'उद्या लगेच तुमच्या कामाची प्रक्रिया सुरू करून परवाना देतो,' असे सांगितले.

त्यानंतर काही कागदपत्रे घेत जिल्हाधिकार्‍यांसह अन्य काही ठिकाणी पैसे द्यावे लागतील असे म्हणून वेळोवेळी राहुल यांच्याकडून 53 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर राहुल यांना जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट पत्र देत फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्कर्षसह त्याची पत्नी अंकिता व आई संध्या सातकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दरम्यान, उत्कर्ष हा दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार, पोलिस नाईक हेमंत कुंजीर, महिला पोलिस शिपाई रूपाली निंभोरे यांच्या पथकाने दिल्ली गाठत उत्कर्षला अटक केली. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार व पोलिस शिपाई नीरज पिसाळ हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान उत्कर्ष याने आणखी 18 जणांना फसवणूक केल्याचे पुढे आले आहे.

उत्कर्ष सातकर याने यापूर्वी अनेकांना वेगवेगळे परवाने काढून देतो. शालेय मुलांचे काम करून देतो, असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता आहे. काही घटना समोर आल्या आहेत. अशा पद्धतीने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तक्रार दाखल करावी. त्यानुसार तत्काळ कारवाई केली जाईल.

– प्रमोद क्षीरसागर, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर पोलिस ठाणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news