पुणे : अधिकमासातील विधीसाठी बुकिंग सुरू | पुढारी

पुणे : अधिकमासातील विधीसाठी बुकिंग सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यंदा अधिकमासाचा संयोग जुळून आला असून, येत्या मंगळवारपासून (दि. 18) अधिक श्रावणमासाला सुरुवात होत आहे. 16 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या अधिकमासात श्री सत्यनारायण पूजा, श्रीविष्णुयाग, होमहवन असे काही मोजकेच धार्मिक विधी होणार आहेत. त्यामुळे या धार्मिक विधी- कार्यक्रमांसाठी गुरुजींकडे  धार्मिक विधी-कार्यक्रमांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगही झाले आहे.
दर तीन वर्षांनी येणारा अधिकमास यंदा श्रावण महिन्यात आला असून, यंदा दोनदा श्रावण महिना असणार आहे. अधिक श्रावणमासातील धार्मिक विधी-कार्यक्रमांसाठी गुरुजींकडे बुकिंग झाले आहे.  तर दुसरीकडे यावर्षी श्रावण अधिक असल्याने श्रावण मासात केली जाणारी सर्व व्रतवैकल्य जसे की श्रावणी सोमवार, मंगळागौर, वरदलक्ष्मीव्रत आदी निज मासात म्हणजेच 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत करावीत. ती अधिकमासात करू नयेत. त्यामुळे पहिला श्रावणी शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी, तर पहिला श्रावणी सोमवार 21 ऑगस्ट रोजी असल्याची माहिती दाते पंचागकर्तेचे मोहन दाते यांनी दिली.
दाते म्हणाले, अधिकमासात महिनाभर उपवास, अयाचित म्हणजे भोजन करते वेळी न मागता मिळेल तेवढेच खाणे.  माध्याह्नी एक वेळ भोजन करणे, नक्त भोजन म्हणजे दिवसा उपवास करून रात्री भोजन करणे, मौन भोजन म्हणजे भोजनाच्यावेळी मौनव—त धारण करणे. ज्यांना महिनाभर शक्य नाही त्यांनी वरीलपैकी तीन दिवस किंवा एक दिवस तरी ते आचरणात आणावे. या महिन्याची देवता पुरुषोत्तम असल्याने श्रीविष्णुयाग, पूजा करता येईल.

अधिकमास म्हणजे पुरुषोत्तम मास…

अधिकमास हा तीन वर्षांतून एकदा येतो. या मासास अधिकमास, मलमास, धोंडामास असेही म्हणतात.  अधिकमासात नेहमीची व्रतवैकल्ये करता येत नाहीत. प्रत्येक महिन्याची एक-एक देवता सांगितली आहे. त्याप्रमाणे या अधिकमासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने या  अधिकमासास पुरुषोत्तम मास असेही म्हटले आहे.

यंदा गणेशोत्सव उशिराने

यंदा अधिकमास म्हणजे दोनदा श्रावणमास  असल्यामुळे यावर्षी गणेशोत्सव गेल्या वर्षीपेक्षा 19 दिवस उशिरा आला आहे. त्यामुळे गणरायाचे आगमन 19 सप्टेंबर रोजी होणार आहे, असेही दाते यांनी सांगितले.
अधिकमासातील  धार्मिक-कार्यक्रमांसाठी गुरुजींकडे विचारणा होत आहे. अधिक श्रावणमासासोबत त्यानंतर येणार्‍या श्रावणातील धार्मिक विधी-कार्यक्रमांसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंगही झाले आहे.
– अजित चावरे,
 गुरुजी ऑन डिमांड
हेही वाचा

Back to top button