लवंगी मिरची : आली समीप घटिका!

लवंगी मिरची : आली समीप घटिका!
Published on
Updated on

स्थळ : टेलरचे दुकान. जनसेवेसाठी आसुसलेले तीन वेगळ्या पक्षांचे भावी मंत्री चर्चा करत आहेत.
वा, वा भरतराव छान दिसतो आहे जोधपुरी कोट! काय तो कोटाचा रंग, काय ती दाढी? वा, वा! अगदी कॅबिनेट मंत्री म्हणून शोभत आहात.

अहो, कशाचे काय घेऊन बसला आहात? पाचवा कोट शिवतो आहे हा असा. मंत्रिपद जवळ येते आणि तसेच दूर निघून जाते. आपल्याला काय आहे? तयार राहायचे, पुकारले नाव की घ्यायची मंत्री पदाची शपथ. या वेळेला मात्र आमचे मंत्रिपद टप्प्यात आले आहे, असे वाटत आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि एका जरी मंत्र्याला घ्यायचे ठरले, तर माझे नाव त्यामध्ये असणारच आहे. प्रश्न एवढाच आहे की, आता मुहूर्त लागतो कधी आणि मंत्रिपदाची माळ गळ्यात पडते कधी? हे एक तो ईश्वर किंवा दिल्लीश्वरच जाणे.

तुमचे बरे आहे, किमान देवाची कृपा तरी तुमच्यावर होऊ शकते. आमची म्हणजे 'पार्टी विथ डिफरन्स' आहे. पक्ष नेतृत्व ज्याचे नाव देईल त्यालाच ते मंत्रिपद मिळणार आहे. नाही मिळाले, तर गपचूप आपले काम चालू ठेवायचे. लक्षात ठेवा, आमचा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. जागतिक पक्ष असल्यामुळे आम्हाला शिस्त म्हणजे शिस्त असते. अगदी लहानपणी शाखेपासून आम्हाला शिस्त शिकवली जाते; पण या वेळेला काय झाले की, माझे मंत्रिपद नक्की होते; पण धाकल्या बारामतीकरांचा पंचेचाळीस जणांचा जथा सोबत आला. त्यामुळे आमच्या नेतृत्वाला प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी जागा मिळवून देणे आवश्यक आहे, म्हणून आम्ही शांत आहोत; पण आमची ही म्हणाली की, बुवा समजा तुमची वर्णी लागली, तर ऐनवेळेला धावपळ नको म्हणून आपला एक सूट, कोट तयार ठेवा. म्हणून इकडे टेलरकडे आलो आहे.

तुमचे दोघांचे बरे आहे; पण माझी फार वेगळी परिस्थिती आहे. आमच्यापैकी नऊ जण आधीच सूट, कोट, जॅकेट घालून मंत्रिपदाची शपथ घेऊन बसले आहेत. आता ऐनवेळेला आणखी काही लोकांना संधी नक्कीच मिळणार आहे. राजकारण म्हणजे शेवटी काय आहे, तर संधी मिळवण्याचा खेळ आहे. या खेळामध्ये सगळेच पक्ष वाक्बगार आहेत. त्यामुळे मी विचार केला की, ऐनवेळेला आपले नाव पुकारले गेले, तर आपण आपल्या नेहमीच्या बेंगरूळ अवतारात असायला नको, म्हणून म्हटले सूट, कोट शिवून ठेवूयात. लागला नंबर तर लागला.

बघा मित्रहो, हे टीव्ही चॅनेलवाले आमदार लोकांच्या हृदयाशी खेळत आहेत. काल बातमी होती की, येत्या 24 तासांत मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि आज सकाळी ते सांगताहेत की, पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार. काळीज सारखं धडधड धडधड करत आहे. मिळेल की नाही, मिळेल की नाही या चिंतेने रात्र-रात्र झोप लागत नाही. सारखी महाराष्ट्राच्या जनतेची काळजी. जनतेचे कसे होईल? जनतेचे कसे होणार, या काळजीने बरेच भावी मंत्री तर तब्येतीने खंगायला लागले आहेत. बघूयात काय होते ते. तूर्त टेलर मास्टर एवढे लक्षात ठेवा की, जे काय सूट, कोट, पॅन्ट शिवाल ते थोडे वाढत्या अंगाचे असू द्या म्हणजे झाले. नाही म्हटलं, तरी कधी संधी मिळेल, याचीही शाश्वती नाही. सध्याचा राजकारण काही नैतिकता किती पाळली जाते, याचे काहीच भान नाही बुवा! आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते; मात्र बर्‍याच वेळा निष्ठावंतानाच थांबावे लागते. मग, सत्ता टिकवण्यासाठी बाहेरून आलेल्यांना संधी लागते, बुवा!

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news