दाखल्यासाठी अर्ज करायला शुक्रवारी या! हवेली ई-सेवा केंद्रातील कर्मचार्‍यांचे उत्तर | पुढारी

दाखल्यासाठी अर्ज करायला शुक्रवारी या! हवेली ई-सेवा केंद्रातील कर्मचार्‍यांचे उत्तर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असून, दाखले मिळविण्यासाठी पालक महा-ई-सेवा केंद्रांत गर्दी करत आहेत. दुसरीकडे हवेली तालुका महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यासाठी अर्ज स्वीकारणेच बंद केले असून, ’अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी या,’ असे अजब उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पालकांच्या पदरी निराशा आली आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानात दाखले वितरण आणि लाभ देण्याचा विक्रम केला जात आहे.

मात्र, स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळीच असल्याचे हवेली तालुका महा-ई-सेवा केंद्रात बुधवारी उघडकीस आले. प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे पालक हैराण झाले असून, अनेक पालक महा-ई-सेवा केंद्रात प्रत्यक्ष अर्ज करून दाखला मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्या ठिकाणीही त्यांच्या पदरी निराशा येत असल्याचे दिसून येत आहे.

जेजुरी येथे होणार्‍या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याचे दिसून आले. मात्र, दुसरीकडे हा कार्यक्रम रद्द झाला. हवेली तालुक्याचे महा- ई-सेवा केंद्र पुणे रेल्वे स्टेशनच्या बसस्थानकाच्या इमारतीमध्ये आहे. त्या ठिकाणी दाखल्यांसाठी नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी सूचना लावण्यात आली. त्यामुळे अनेक पालकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

अर्ज का स्वीकारले जात नाहीत, असे विचारले असता, लाभार्थ्यांची यादी करायचे काम सुरू आहे. आज आणि उद्या हे सुरू असेल. त्यामुळे नवीन अर्ज करण्यासाठी शुक्रवारी या, अशी सूचना महिला कर्मचा-यांनी दिली. दरम्यान, कार्यालयात एका कर्मचार्‍याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी गप्पांची मैफीलही रंगली होती. त्यामुळे दाखल्यासाठी अर्ज करण्यासाठी, दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना बराच काळ ताटकळत थांबावे लागले.

ऑनलाईनचा घोळ मिटेना

राज्य शासनाकडून सर्व दाखले हे ऑनलाइन दिले जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र, ऑनलाइन प्रणालीमध्ये वेळोवेळी येणार्‍या तांत्रिक अडचणी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यात काही सुधारणा झालेली नाही.

हेही वाचा

नियमबाह्य भरती; परभणीचे दोन शिक्षणाधिकारी निलंबित

पुणे : अकरावीच्या तिसर्‍या फेरीत वाढले कटऑफ

विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल!

Back to top button