नानगाव (पुणे ) : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत काही आमदारांसमवेत सत्तेत सहभाग घेतला आणि थेट उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. यामुळे जिल्हा तसेच तालुक्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे काही तालुक्यातील नेत्यांना अडचणी झाल्या असून, काही नेत्यांना अच्छे दिन आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या फुटीचा फायदा भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.
दौंड तालुक्यात मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत झाली होती. या निवडणुकीत हजार मतांच्या आतच आमदार राहुल कुल यांचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगलेच नियोजन केले होते. मात्र, नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे यावर सगळेच पाणी फेरले गेल्याची चर्चा आहे. पुढील काळात दौंड तालुक्यात विद्यमान आमदार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राहुल कुल यांच्यासाठी भाजपच्या माध्यमातून उमेदवारी असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार इच्छुक असणार असून, यांना शह देण्यासाठी शरद पवार यांच्या गटाकडूनदेखील एक उमेदवार असणार असल्याचे आतापासूनच बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद विभागल्याने मतांची विभागणी होणार आणि भाजपाच्या उमेदवाराला याचा फायदा होणार हे सोपे गणित आहे.
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय वातावरणाचा काहीही अंदाज घेता येत नाही. राजकारणात कधी काय घडेल, याची शाश्वती नाही तर कोण कधी कोणाबरोबर जाईल हेदेखील सांगता येत नाही. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेता तालुक्यात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन असल्याची चर्चा मात्र तालुक्यात जोरात सुरू आहे.
दौंडच्या मंत्रिपदाला ब्रेक?
दौंडचे आमदार राहुल कुल यांना नक्कीच मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा असताना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी नक्कीच मंत्रिपद मिळेल असे वाटत असतानाच अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आणि स्वत:च्या पदरात नऊ मंत्रिपदे मिळवून घेतली. त्यामुळे सध्याच्या राजकीय वातावरणात दौंडला मंत्रिपद मिळणार का, याबाबत संभ—माचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :