

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येथील साई चौकातील श्रीनिवास सोसायटीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला महावितरणने रोहित्र बसविले आहे. परंतु, गेल्या तीन-चार वर्षांपासून रोहित्राला दरवाजा नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
नवीन सांगवीतील अत्यंत वर्दळीच्या तसेच गर्दीच्या ठिकाणी हे रोहित्र बसविले असून समोरच भाजी मंडई आहे. रोहित्राला लागूनच रस्त्याच्याकडेला बसशेड आहे. या बसशेड मध्ये रात्री मद्यपी मद्यप्राशन करून बाटल्या, प्लास्टिक बॉटल, खाद्यपदार्थांचे पाऊच आदी कचरा कुंपणाच्या आत रोहित्रा सभोवताली टाकत आहेत. रोहित्रासाठी बसविण्यात आलेला कुंपणाचा दरवाजा निखळून पडलेला आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे.
रात्री अपरात्री दरवाजा निखळून पडल्याने भटकी जनावरे, भटकी कुत्री, मद्यपी आत जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. महावितरणने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील कुंपणाच्या दरवाजाची दुरूस्ती करून होणारी दुर्घटना टाळावी. जेणे करून यापुढे भटकी जनावरे, भटकी कुत्री, मद्यपी आत जाऊ शकणार नाहीत. मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे आण्णा जोगदंड यांनी सांगवीतील महावितरण विभागातील रत्नदिप काळे यांना निवेदन देवून रोहित्राला दरवाजा बसविण्याची मागणी केली आहे.
परिसरातून ये-जा करताना आजूबाजूचे काही नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. श्रीनिवास सोसायटीतील नागरिक संजय चव्हाण यांनी आरोग्य विभागास संपर्क करून कुंपणाच्या आतील रोहित्राच्या सभोवताली असलेला कचरा उचलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने परिसर स्वच्छ केला आहे. परंतु, वारंवार फोन करूनही रोहित्राला एका बाजूने संरक्षक कुंपण बसवले जात नाही. त्या ठिकाणी मोकाट जनावरे, लहान मुले यांचा सतत वावर असतो. त्यांच्या जीवाला याचा धोका निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा