पणजी : पुढारी वृत्तसेवा, गोव्यातील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे.
काल भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी सदानंद शेट तानावडे यांचे नाव जाहीर केले होते. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव तथा भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी पत्रकातून ही घोषणा केली होती. त्यानंतर आज (मंगळवार) तानावडे यांनी पर्वरी येथील सचिवालयामध्ये राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. आम आदमी पक्षाने या निवडणुकीत राज्यसभेच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवणार नसल्याचे सांगितले आहे. आम आदमी पक्षाकडे ४० पैकी दोन आमदार आहेत. तर तीन आमदार असलेल्या विरोधी पक्ष काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नसला तरी तानावडे यांची बिनविरोध निवड होऊ नये यासाठी काँग्रेसतर्फे उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे कळते.
इतर पक्षांनी उमेदवार उभा न करण्याचे ठरवले आहे. ४० आमदारांच्या गोवा विधानसभेमध्ये विद्यमान भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारला ३३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये भाजपाचे २८ आमदार असून, तीन अपक्ष व मगो पक्षाच्या दोन आमदारांचा सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे तानावडे यांनी अर्ज भरल्यानंतर ते ३३ आमदारांच्या पाठिंब्यावर निवडून येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
मात्र, त्यांची निवड बिनविरोध होऊ नये यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसतर्फे नाममात्र उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे कळते.
तानावडे यांनी आज अर्ज भरल्यानंतर सांगितले की, भाजपच्या केंद्रीय व राज्यातील नेतृत्वाने आपणाला राज्यसभेवर जाण्याची संधी दिल्याबद्दल केंद्रीय व स्थानिक भाजपा नेत्यांचे आपण आभार व्यक्त करत आहे. आपल्या खासदारकीच्या काळामध्ये खासदार निधीचा वापर आपण गोव्यात विविध विकास प्रकल्प उभे करण्यासाठी करणार असून, गोव्याच्या हितासाठी राज्यसभेमध्ये विविध प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले आहे.
तानावडे हे थीवी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांना आमदारकीची संधी होती, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता नवा उमेदवार दिला. तरी तानावडे यांनी पक्षासोबतच राहणे पसंत केले होते. त्यांच्या त्या त्यागाचे फळ म्हणून त्यांना प्रदेश भाजपाचे अध्यक्ष करण्यात आले होते. तानावडे हे अध्यक्ष असताना भाजपाने गोव्यातील पंचायत निवडणुका, जिल्हा पंचायत निवडणुका, पालिका निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या व विरोधकांचा सुपडा साफ केला.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकाही जिंकल्या. गोव्यात पहिल्यांदाच भाजपाला एकाही पक्षाशी युती न करता ४० पैकी २० जागा मिळाल्या. यापूर्वी भाजपाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळामध्ये २१ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यावेळी भाजपची मगो पक्षासोबत युती होती. मार्च २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मगोने तृणमूलशी युती करून निवडणुका लढविल्या. त्यांना फक्त २ जागा मिळाल्या. तर भाजपने कुणाशीही युती न करता २० जागा पटकावल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वावर गोमंतकीयांनी विश्वास व्यक्त करून या पक्षाला तब्बल २० जागा दिल्या . काँग्रेसला ११ जागा मिळाल्या होत्या, मात्र काँग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फुटले व त्यांनी भाजपमध्ये दाखल होणे पसंत केल्यामुळे सध्या भाजपाच्या आमदारांची संख्या २८ एवढी आहे.
हेही वाचा :