भिगवण : मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची उदासीनता | पुढारी

भिगवण : मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची उदासीनता

भिगवण(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यात सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय परीक्षेबाबत शासनाची प्रचंड उदासीनता असल्याचा फटका राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाला बसत आहे. बहुतांश मत्स्यव्यवसाय विभागांची कार्यालयेही अतिरिक्त भारावर अवलंबून आहेत. यामुळे राज्यातील मत्स्य विभागावर कमालीचा ताण आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रकल्प व्यवस्थापक, दापचरी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट-अ व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, अभिरक्षक, प्रशिक्षण व विस्तार अधिकारी (तांत्रिक), महाराष्ट्र मत्स्यसेवा, गट ब पदासाठी जानेवारी 2023 मध्ये चाळणी परीक्षा घेतली.

त्यासाठीची जाहिरात दि. 31 जानेवारी 2020 मध्ये प्रसिद्ध झाली. जाहिरात प्रसिद्ध होऊन आज मितीला 3 वर्षे, तर चाळणी परीक्षेस सहा महिने उलटले तरी परीक्षेची उत्तरतालिका व निकालाबाबतच्या निर्णयाबाबत कसल्याही हालचाली नाहीत. दरम्यान, 20 जानेवारी 2023 रोजी याबाबत संयुक्तिक चाळणी परीक्षा घेण्यात आली. संगणक प्रणालीवरही परीक्षा घेतल्या आहेत. साहजिकच परीक्षा संगणक प्रणालीवर झाल्याने निकाल लवकर येणे अपेक्षित होते. मात्र, तीन वर्षांनंतरही न आल्याने आयोगाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पुणे विभागात नियमित सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त नसल्याने विभागावर सतत ताण असतो. कामेही वेळेत पार पडत नसल्याचे मच्छीमार नेते चंद्रकांत भोई, लोकशासनचे अ‍ॅड पांडुरंग जगताप यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय पदवीधरांकडून निकालाची मागणी

मत्स्यव्यवसाय पदवीधर आदीमधून लवकर निकाल जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेकडून व जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांकडून तात्काळ परीक्षांचा निकाल जाहीर करून नियमित सहायक आयुक्त व इतर रिक्त पदे भरणा करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

भोरच्या दुर्गम भागास शिक्षकांची नापसंती

सुरतच्या कंपनीने बनवले ‘चांद्रयान-3’चे फायरप्रूफ सिरॅमिक घटक

तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा आ. रोहित पवारांवर निशाणा

Back to top button