भोरच्या दुर्गम भागास शिक्षकांची नापसंती | पुढारी

भोरच्या दुर्गम भागास शिक्षकांची नापसंती

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात सध्या जिल्हा परिषदेच्या 263 शाळांवर शिक्षकपदे रिक्त आहेत. तर 31 शाळांवर शिक्षकच नाहीत. मात्र शिक्षण विभागाने शून्य शिक्षक असलेल्या शाळांवर इतर शाळांतील शिक्षक पाठवून तात्पुरती व्यवस्था केली आहे. याचा परिणाम प्राथमिक शाळेतील मुलांना गुणवत्तेवर होणार आहे. भोर तालुक्यातील पश्चिम भाग दुर्गम असून, निरा देवघर व भाटघर धरण भागात विभागलेला आहे. याच भागातील शाळांवर मोठ्या प्रमाणात शिक्षक नाहीत.

शून्य शिक्षक असलेल्या शाळांची संख्याही याच भागात जास्त आहे. या डोंगराळ व दुर्गम भागात शिक्षक नोकरीस तयार होत नसल्याचेच दिसून येते. तालुक्यात 274 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून, 9765 विद्यार्थी आहेत. मंजूर पदे 789 असून पैकी 580 प्रत्यक्षात काम करणारे शिक्षक आहेत. रिक्त पदे 263 आहेत, 31 शाळांवर शून्य, तर 67 शाळांवर एकच शिक्षक आहेत. शेजारच्या शाळेवरील शिक्षक हे शिक्षक नसलेल्या शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात दिले आहेत.

भोर तालुक्यातून 102 शिक्षक बदलून गेले आहेत. नवीन 60 जागा भरल्या आहेत, पैकी सतराच हजर झाले आहेत, तर उर्वरित न्यायप्रविष्टेमुळे प्रलंबित आहेत. त्यात रिक्त पदे ही पश्चिम भागातील जास्त असल्याने या ग्रामीण भागातच शिक्षक भरतीमध्ये अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आपटी केंद्रात 12 शाळा असून, 39 पैकी 15 शिक्षक जागा रिक्त, साळव केंद्रात 10 शाळांतील 32 पैकी 13 रिक्त, शिरगाव केंद्र -9 शाळेतील 30 पैकी 18 पदे रिक्त, हिर्डोशी केंद्र -14 शाळेतील 33 पैकी 17 पदे रिक्त, आंबवडे केंद्र -12 शाळेतील 29 पैकी 09 पदे रिक्त, नाटंबी केंद्र- 14 शाळेतील 28 पैकी 13पदे रिक्त, कर्नावड केंद्र – 8 शाळेतील 25 पैकी 07 पदे रिक्त शून्य शिक्षक असलेल्या शाळा- वेणुपुरी, कोंढाळकरवाडी, खालचे गाव कोंढरी, धामणदेव कारुंगण, माझेरी, कुंड, राजीवडी, उंबर्डे, मानटवस्ती, पर्हर बु., रेणुसेवाडी, करंजगाव, गोळेवाडी, देवघर. पूर्वी भोरमधील 274 पैकी जवळपास 161 शाळा दुर्गम डोंगरी होत्या.

मात्र, शासनाच्या 2022 च्या यादीप्रमाणे फक्त 36 शाळा दुर्गम राहिल्या आहेत. समानीकरण न राबविल्यामुळे बदल्यात तफावत असून, यामुळे 789 मंजूर शिक्षकांपैकी 263 शिक्षक पदे रिक्त आहेत. भोरच्या मावळात पर्यटनाला पसंती आहे, मात्र कायमस्वरूपी शिक्षक म्हणून येण्यास नापसंती आहे.

भागात इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या धामणदेव शाळेत सर्वांत जास्त 28 पट आहे. परंतु आता एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

– पांडुरंग गोरे, माजी सरपंच, हिर्डोशी.

दुर्गम भागातील शाळांसाठी शिक्षक उपलब्ध व्हावेत, जेणेकरून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये

– जीवन शिंदे, केंद्रप्रमुख

हेही वाचा

सुरतच्या कंपनीने बनवले ‘चांद्रयान-3’चे फायरप्रूफ सिरॅमिक घटक

तुम्ही आईच्या पोटात होते तेव्हा मी मंत्री; छगन भुजबळ यांचा आ. रोहित पवारांवर निशाणा

वेल्हे : खडकवासला धरण क्षेत्रात तुरळक पाऊस

Back to top button