पश्चिमी वारे कमजोर झाल्याने राज्यात पाऊस कमी | पुढारी

पश्चिमी वारे कमजोर झाल्याने राज्यात पाऊस कमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पश्चिमी वारे महाराष्ट्रातच कमजोर झाल्याने येथे पाऊस कमी झाला आहे. वार्‍याचा वेग सध्या उत्तर भारतात 30 नॉट इतका असल्याने तिथे पूरस्थिती आहे. महाराष्ट्रात तो 15 नॉट इतका आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र 16 ते 24 जुलै दरम्यान ही परिस्थिती बदलणार असून, मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. देशभरात चांगला पाऊस सुरू असताना कोकण वगळता उर्वरित राज्यात जुलैच्या दुसर्‍या आठवड्यातही तो मुसळधार पडताना दिसत नाही. त्यामुळे ’अल निनो’च्या प्रभावाची चर्चा सुरू झाली. मात्र, यात तथ्य नसल्याचे पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विभाग प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

वार्‍याचा वेग कमी म्हणून मान्सून कमजोर…

मान्सूनचे वारे पश्चिमेच्या दिशेने वाहत ते दक्षिण भारताकडून हिमालयाकडे जात तिथे स्थिर होतात. या वार्‍याचा वेग 25 ते 30 नॉट इतका असला की, पाऊस मुसळधार पडतो किंवा अतिवृष्टी होते. मात्र, मान्सून सक्रिय झाल्यापासून महाराष्ट्रातील वार्‍याचा वेग 15 नॉटच्या वर गेलेला नाही. त्यामुळे रिमझिम पाऊस सुरू आहे, अशी माहिती कश्यपी यांनी दिली.

मान्सून ट्रफ राजस्थानात….

सध्या मान्सूनचा ट्रफ राजस्थानात आहे. मान्सून ट्रफ म्हणजे एक लांबलचक कमी दाबाचे क्षेत्र असते. जे पाकिस्तानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेले असते. ते मान्सून स्थिर करते. हिमालयाच्या पायथ्याशी ते स्थिर झाले की, संपूर्ण देशात भरपूर पाऊस पडतो. मात्र, सध्या हा ट्रफ उत्तर भारतात राजस्थानात आहे. तो खाली आलेला नाही. तो जसजसा खाली सरकेल तसा महाराष्ट्रात पाऊस वाढेल.

वारे गुजरात मार्गे राजस्थानात

यंदा मान्सून कोकणात सुमारे 20 दिवस अडखळला. त्यामुळे राज्यात पावसाला विलंब झाला. शेवटी मान्सून बंगालच्या उपसागरातील दुसर्‍या शाखेकडून विदर्भमार्गे सक्रिय झाला. ते वारे गुजरात व राजस्थानात वेगाने गेले. मात्र महाराष्ट्रात अचानक कमजोर झाले. त्याचा वेग 30 ऐवजी 15 नॉट इतकाच राहिला. त्यामुळे गुजरात, राजस्थानसह हिमालयापर्यंत सर्वत्र पाऊस वाढला. मात्र, महाराष्ट्र अन् दक्षिण भारतात तो कमी झाला.

तूट भरून काढण्याचा अंदाज

मान्सून सध्या राज्यात कमजोर असला तरी 16 जुलैपासून तो पुन्हा वेग घेणार आहे. वार्‍याचा वेग 15 वरून 20 ते 25 नॉट इतका जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे कोकणासह उर्वरित राज्यातला पाऊस वाढेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील जून-जुलैची पूर्ण तूट भरून काढेल, असा विश्वास कश्यपी यांनी व्यक्त केला.

अल् निनोचा संबंध नाही…

कश्यपी यांनी सांगितले की, राज्यात ’अल निनो’ सक्रिय झाल्याची चर्चा चुकीची आहे. कारण तसे असते तर उत्तर भारतातदेखील पाऊस कमी झाला असता. पण तेथे वार्‍याचा वेग योग्य आहे, त्यामुळे पूरस्थिती आहे. मान्सून ट्रफ उत्तर भारतातून मध्य प्रदेशपर्यंत आला तरीही मोठा पाऊस सुरू होईल.16 ते 24 जुलैपर्यंत तसे वातावरण महाराष्ट्रात तयार होईल, असा अंदाज आहे.

वार्‍याचा वेग ’नॉट’ या एककात मोजला जातो. या नकाशात तीन रंगाळत वार्‍याचा वेग दाखवला आहे. अरबी समुद्राकडून महाराष्ट्रात येणार्‍या वार्‍याचा वेग सध्या 15 नॉट आहे, तो फिकट निळ्या रंगात दाखवला आहे. निळ्या रंगात त्याचा वेग 20 नॉट इतका असून, गडद निळ्या रंगात त्याचा वेग 30 नॉटपेक्षा जास्त आहे. या वेगाचे वारे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले असून, ते 16 ते 24 जुलैदरम्यान राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता दर्शवणारे हे मॉडेल पुणे वेधशाळेने प्रसारित केले आहे.

हेही वाचा

बार्शी : उधारीचे पैसे मागितल्याने घर पेटवले

सोलापूर : इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर जिल्ह्यात 300 महिला बचत गटांच्या माध्यमातून मिरची उत्पादन

Back to top button