पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजितदादा-शरद पवार एकाच मंचावर; ‘या’ कार्यक्रमासाठी येणार एकत्र | पुढारी

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजितदादा-शरद पवार एकाच मंचावर; 'या' कार्यक्रमासाठी येणार एकत्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय’ पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांचा 103 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने होणार्‍या विशेष कार्यक्रमात मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष असून मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या या कार्यक्रमाला मोदी यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. मोदी यांचे हेच कार्य लक्षात घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. यावेळी उपस्थित राहणार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मोदी, पवार पुण्यामध्ये एकाच मंचावर

राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. दोघेही एकत्र येणार असल्यामुळे ते काय बोलतील, यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार प्रोटोकॉलप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने शपथविधीनंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार हेही एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.

हेही वाचा

सोलापूर : अजित पवारांच्या मातोश्रीचे विठ्ठलास साकडे अन् एकनाथ शिंदेंच्या पत्नीचा स्वामी समर्थांना धावा

चंद्रपूर : नागभीड जिल्हानिर्मितीसाठी धडकला तहसील कार्यालयावर मोर्चा

ठाणे : दिघा रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांसाठी खुले होणार

Back to top button