पिरंगुट(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भूगाव आणि पिरंगुट येथे पुणे-कोलाड महामार्गावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाणी साचून तळी तयार झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे, तर काही ठिकाणी अपघात होत आहेत. दोन्ही ठिकाणी बाह्यवळण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. चार वर्षांपूर्वी पुणे-कोलाड महामार्गाचे नूतनीकरण झाले. त्यावेळी चांगला रस्ता होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. मात्र, या रस्त्याची स्थिती सुधारली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
भूगाव गावठाणामध्ये महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. चांदणी चौक सोडला की, भूगावपर्यंत महामार्ग अतिशय छोटा होतो. त्यामध्येच खड्ड्यांची भर पडते. सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच वर्षाविहारासाठी मुळशी तसेच कोकण परिसरात जाणार्या पर्यटकांची वाहने मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. त्यामुळे या भागात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होते. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी तसेच जागा मालकांनी महामार्गापेक्षा उंच मुरमाचा भराव केल्यामुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावर येत आहे.
तसेच ठेकेदाराने महामार्गाला गटार न काढल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी जागोजागी साचून खड्डे पडत आहेत. त्यातच वाहतूक संथ होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्याचा मनस्ताप सर्वांनाच सहन करावा लागत आहे. लवळे फाट्यावरील पूल, पिरंगुट ओढ्यावरील पूल आणि घोटवडे फाटा चौक ठिकाणी खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाली आहे.
शनिवार, रविवारच्या दिवशी तर 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून, 2 किलोमीटर जाण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागत आहे. संबंधित प्रशासनाकडून तात्पुरते खड्डे बुजवले जात आहेत. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. याबाबत कायमचा उपाय म्हणून या ठिकाणी बाह्यवळण हाच पर्याय आहे. बाह्यवळण झाल्यास या ठिकाणी वाहतुकीची कोंडी समस्या दूर होऊ शकते, असे ग्रामस्थ सांगत आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आम्हाला खड्ड्यांतूनच जावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा