प्रदीप कुरूलकर प्रकरण : भलत्याच लॅपटॉपचा अर्ज मागे | पुढारी

प्रदीप कुरूलकर प्रकरण : भलत्याच लॅपटॉपचा अर्ज मागे

दिनेश गुप्ता/महेंद्र कांबळे

पुणे : प्रदीप कुरूलकर वापरत असलेला लॅपटॉप एटीएसला न देता दुसर्‍याच व्यक्तीचा लॅपटॉप डीआरडीओने दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यानंतर तपासाची दिशा भरकटली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हेतूने एटीएसने त्याच्या विभागाशी पत्रव्यवहार करून झालेल्या चुकीचा प्रकार लक्षात आणूनही दिला होता. दरम्यान, एटीएसकडून घाईघाईत या घटनेची माहिती न्यायालयात अर्ज करून दिली गेली. त्यांनी दाखल केलेला लॅपटॉप संदर्भातील तो अर्जच आता मागे घेतल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

कुरुलकर वापरत असलेल्या लॅपटॉपऐवजी भलताच लॅपटॉप दिल्याचा न्यायालयात अर्ज करणार्‍या एटीएसने तो अर्ज मागे घेतल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. संरक्षण दलाची गुपिते पाकिस्तानच्या हाती देणार्‍या डीआरडीओतील शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. डीआरडीओतील यंत्रणाच त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तर नाही ना, असे बोलले जात आहे. मात्र, शेवटच्या क्षणी एटीएसने घेतलेली माघार न्यायालयासदेखील खटकली असून, सुनावणीदरम्यान हा विषय चर्चेत आला होता.

देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण होईल, असे कृत्य कुरुलकर याने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यावर एटीएसने (दहशतवादी विरोधी पथकाने) त्यास अटक केली होती. डीआरडीओने कुरुलकर वापरत असलेला मोबाईल, एक लॅपटॉप आणि त्या डिव्हाईसचे अन्य साहित्य जप्त करून एटीएसकडे सोपवले होते. तपास सुरू केल्यावर एटीएसने फॉरेन्सिक लॅबकडे लॅपटॉपसहित अन्य साहित्य तपासणीसाठी दिले. त्या तपासणीत डीआरडीओने सोपविलेला लॅपटॉप हा भलताच असल्याचे उघड झाले होते. शुक्रवारी न्यायालयात कुरुलकरच्या व्हॉईस रेकॉर्डिंगबाबत सुनावणी दरम्यान त्या अर्जाबाबत न्यायालयाने चर्चा केली. त्या वेळी एटीएसने तो अर्ज मागे घेतल्याचे सांगितले.

‘त्या’ लॅपटॉपमध्ये होत्या सर्व लिंक्स

कुरुलकर लॅपटॉपवर वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स तिथे होत्या. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेस याच लॅपटॉपमधून माहिती गेल्याची शंका होती. डीआरडीओने केलेली चूक जाणीवपूर्वक होती की, कोणाच्या आदेशानुसार होती याची चर्चा रंगली आहे. याशिवाय त्या ललनेशी झालेल्या चॅटिंगची विस्तृत माहितीही याच लॅपटॉपमध्ये असल्याची शंका होती.

हेही वाचा

भाजपकडूनही भाकरी फिरविण्यास सुरुवात

उत्तर भारतात पावसाचे तांडव; १४ जणांचा मृत्यू

सातारा : फलटणमध्ये आयुर्वेदिक काढा घेतल्यानंतर बाप-लेकाचा मृत्यू?

Back to top button