उत्तर भारतात पावसाचे तांडव; १४ जणांचा मृत्यू | पुढारी

उत्तर भारतात पावसाचे तांडव; १४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  मुसळधार पावसाने दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि पंजाबसह उत्तर भारतात धूळधाण उडवली. ‘देवभूमी’ हिमाचलमध्ये नदीवरील पूल, राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते वाहून गेले. राजधानी दिल्लीत तर पावसाने 41 वर्षांतील विक्रम मोडल्यामुळे जागोजागी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथे पोशाना नदी पार करत असताना भारतीय लष्कराच्या दोन जवानांचा बुडून मृत्यू झाला. पाच राज्यांना पावसाचा फटका बसला आहे.

दिल्लीत मुसळधार पावसाने 41 वर्षांचा विक्रम मोडला. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत 1982 पासून जुलैमध्ये एका दिवसात सर्वाधिक 153 मि.मी. पाऊस पडला. यापूर्वी 25 जुलै 1982 रोजी 169.9 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. 2003 मध्ये 24 तासांत 133.4 मि.मी. पाऊस झाला होता; तर 2013 मध्ये 123.4 मि.मी. पाऊस पडला होता.

दिल्ली, गुरुग्राम जलमय

दिल्लीत अनेक भागांत पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री थेट रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या भागात पाऊस सुरूच असून गुरुग्राममध्येही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे तेथील लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशात सहा मृत्यू

हिमाचल प्रदेशात घर पडणे, जमीन खचणे आणि वीज पडणे यांसारख्या विविध घटनांत सहाजणांचा मृत्यू झाला. सिमला येथे पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वाहून गेला. तसेच मनाली-लेह हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. पावसाचा जोर वाढत चालल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हिमाचल प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवसांची (10 आणि 11 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच महादेव श्रीखंड यात्रादेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. राजस्थानमध्ये आतापर्यंत चार जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये रविवारी पहाटे मुसळधार पावसामुळे घर कोसळून एक महिला आणि तिच्या लहान मुलीचा मृत्यू झाला.

दोघा जवानांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेल्यामुळे दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सुरनकोट भागातील डोग्रा नाला ओलांडत असताना आलेल्या एका जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले. नायब सुभेदार कुलदीप सिंग आणि लान्स नाईक तेलू राम अशी या दोघांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत.

तेवीस राज्यांत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा

मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशसह देशातील 23 राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमरनाथ यात्रा स्थगित

संततधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वार्षिक अमरनाथ यात्रा रविवारी सलग तिसर्‍या दिवशी स्थगित करण्यात आली. श्रीनगर-जम्मू महामार्गावर सुमारे तीन हजार वाहने अडकली आहेत. तेथील रस्त्याचा काही भाग शनिवारीच खचला होता. मुसळधार पावसामुळे सुमारे सहा हजार भाविक रामबनमध्ये अडकले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीरसह उत्तर भारताला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन, वृक्ष उन्मळून पडले आहेत. पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. वाहने अडकून पडण्याबरोबरच काहीजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. 1) गुरुग्राम : पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. 2) सिमला : सिमल्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे घर गाडले गेले. 3) नवी दिल्ली : मुसळधार पावसाने राजधानी नवी दिल्ली जलमय झाली आहे. शहराच्या एका भागात रस्ता खचला असून, प्रचंड मोठा खड्डा पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 4) गुरुग्राम : पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल्या ठिकाणी कार अडकून पडली. या कारमधील प्रवाशांना बाहेर काढताना. 5) मंडी : तुफान पावसामुळे मंडी नदीला महापूर आला आहे. 6) धरमशाला : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आली.

Back to top button