पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) रोजंदारी म्हणून काम करीत असलेले सुमारे 2 हजार कर्मचारी गेल्या 4 वर्षांपासून 'कायम' होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, कायम करण्यासंदर्भातील धोरण प्रशासनाने अद्याप निश्चित केले नसल्यामुळे आम्ही कधी कायम होणार? आणि नवीन अध्यक्ष आमच्यासाठी काही करणार का? याची या कर्मचार्यांना उत्सुकता लागली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2017-18 मध्ये भरती झालेल्या 1 हजार 925 बदली हंगामी कामगारांना अद्याप प्रशासनाकडून कायम करण्यात आलेले नाही. तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे 1400 बदली हंगामी कर्मचार्यांना कायम केले होते. त्यानंतरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यकाळात तरी आम्हाला कायम केले जाईल, अशी या कर्मचार्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या हाती निराशाच लागली. आता नव्याने पदभार घेतलेले अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग यांनी यात लक्ष घालून आम्हाला कायम करावे, अशी मागणी या कर्मचार्यांकडून केली जात आहे.
चालक : 2 हजार 296
वाहक : 4 हजार 776
प्रशासकीय कर्मचारी : 600
अभियांत्रिकी (वर्कशॉप) : 1,100
सुरक्षा कर्मचारी : 675
एकूण कर्मचारी : 9,022
(बदली हंगामी कर्मचारी एकूण : 1925)
बदली हंगामी रोजंदारी कर्मचार्यांना किती वर्षांनी कायम करायला हवे, यासंदर्भात धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे कामगारांना कायम होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बदली कर्मचार्यांकडून केली जात आहे.
आता 5 वर्षे झाली, किती दिवस आम्ही बदली हंगामी कामगार म्हणून काम करणार? कोरोना काळात तर आम्हाला काम आणि वेतन नव्हते, आमचे खूप हाल झाले. प्रशासनाने आम्हाला आता लवकरात लवकर कायम करावे, नवीन अध्यक्षांनी लक्ष घालून न्याय द्यावा.
– एक बदली हंगामी रोजंदारी कामगार
हेही वाचा