पुणे जिल्हा परिषदेच्या ग्राम अभ्यासिकेला प्रतिसाद मिळेना!

पुणे जिल्हा परिषदेच्या ग्राम अभ्यासिकेला प्रतिसाद मिळेना!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका सुरू करण्यात आल्या. मात्र, या अभ्यासिकांना प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे गटविकास अधिकारी अभ्यासिकेचे, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करणार आहेत, तशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या युवकांना या अभ्यासिकांचा अधिकाधिक वापर करता यावा, या उद्देशाने या सर्व अभ्यासिका आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या युवक-युवतींसाठी खुल्या करण्यात आल्या. ग्रामीण भागातील युवक-युवतींचा स्पर्धा परीक्षेतील टक्का वाढविणे, हा या मागचा उद्देश आहे. या ग्राम अभ्यासिकांमध्ये मागासवर्गीय युवक व युवतींना नाममात्र दराने प्रवेश देण्यात येतो.

नियंत्रण व देखरेखीसाठी जिल्हा, तालुका पातळीवर संनियंत्रण समित्या; तर गावपातळीवर युवक कार्यकारी समित्यांची स्थापना करण्यात येणार आहेत. दरम्यान, ग्राम अभ्यासिकेमध्ये लाभार्थ्यांची नोंदणी अतिशय नगण्य प्रमाणात झाल्याची बाब जिल्हा परिषदेच्या समन्वय बैठकीत समोर आली. त्यानंतर प्रसाद यांनी गटविकास अधिकार्‍यांना अभ्यासिकांच्या शेजारी असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यास, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देण्याचेही सांगितले आहे. अभ्यासिकेच्या गावातील युवकांमधून युवा कार्यकारी समिती तयार करून युवा कार्यकारी समितीच्या माध्यमातून अभ्याससत्र, चर्चासत्राचे नियोजन, संवाद कार्यक्रम, सराव परीक्षा, सहभाग वाढविणे आणि कार्यशाळांचे आयोजन करणे आदींसाठी प्रत्येकी एका सदस्याची युवकांमधून निवड केली जाणार आहे शिवाय गावचे सरपंच हे पदसिद्ध सदस्य असणार आहेत. याशिवाय या समितीत स्थानिक पातळीवरील तज्ज्ञ प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, जमाती व महिला प्रतिनिधींचा सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे.

अभ्यासिका प्रवेशासाठीची पात्रता व निकष

  • इच्छुक विद्यार्थी संबंधित तालुक्यातील असणे आवश्यक
  • विद्यार्थ्याचे वय हे 18 ते 43 दरम्यान असावे
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश
  • खुल्या गटातील विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र
  • मागासवर्गीय विद्यार्थ्याने जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य
  • प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी किमान 12 वी उत्तीर्ण असावा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news