पुणे : विनयभंगाचा जाब विचारल्याने मारहाण | पुढारी

पुणे : विनयभंगाचा जाब विचारल्याने मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने जाब विचारणार्‍या आईला तरुणाने भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्या पाटील (रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. शाळा सुटल्यानंतर महिलेची 14 वर्षांची मुलगी महिलेला मदत करते. पाटीलने मुलीचा विनयभंग केला. त्या वेळी महिलेने त्याला जाब विचारला. पाटीलने मुलीच्या आईला भररस्त्यात शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना नागरिकांची गर्दी झाली; मात्र सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली. पसार झालेल्या पाटीलविरुद्ध विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर लक्याने घराला कुलूप लावून धूम ठोकली. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.

मोठा प्रसंग टळला
मुलीला आणि तिच्या आईला मारहाण करीत असताना नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. परंतु, त्याचवेळी रिक्षातून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गायकवाड यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोपीला हटकले तसेच त्या आरोपीपासून त्या महिलेची आणि मुलीची सुटका करण्यात मदत केली. त्यामुळे मोठा प्रसंग टळला. मात्र, बघ्याची भूमिका घेणार्‍या नागरिकांबाबत त्यांनी संताप व्यक्त केला तसेच सामाजिक कार्यकर्त्या वंदना चंदनशिवे यांनी देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा :

Kashmir issue | सुरक्षा परिषदेत पाकने पुन्हा वाजविले काश्मीरचेच तुणतुणे

सातारा : भांबवलीचा हंगाम आजपासून सुरू

Back to top button