Kashmir issue | सुरक्षा परिषदेत पाकने पुन्हा वाजविले काश्मीरचेच तुणतुणे | पुढारी

Kashmir issue | सुरक्षा परिषदेत पाकने पुन्हा वाजविले काश्मीरचेच तुणतुणे

लंडन, वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ब्रिटनमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरचे तुणतुणे वाजविले. त्यावर काश्मीर आमचा हे सांगायला पाकिस्तानकडे केवळ मुस्लिम कार्ड आहे. जग प्रगतीचे नवनवे टप्पे साधत असताना पाकिस्तान दिवसेंदिवस कट्टर धर्मांधतेच्या खोलात चाललेला आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला खडसावले. (Kashmir issue)

लडाख आणि जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत आणि नेहमी राहतील. पाकिस्तानला याबाबतीत काय वाटते किंवा पाकिस्तानला काय हवे आहे, याने भारताला तसुभरही फरक पडत नाही, असे उत्तर संयुक्त राष्ट्रांतील भारताचे मिशन कौन्सिलर आशिष शर्मा यांनी दिले. वास्तविक, मुले आणि सशस्त्र संघर्ष हा परिषदेच्या बैठकीचा विषय होता. पाकिस्तानचे राजनयिक अधिकारी मुनीर अक्रम यांनी इथेही काश्मीरचा मुद्दा ओढून ताणून आणला.

संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांच्या मुले आणि सशस्त्र संघर्ष या विषयाबाबतच्या नव्या अहवालात भारताचा उल्लेख नाही, यावर अक्रम यांनी बोट ठेवले. काश्मीरचा संदर्भ त्यासाठी अक्रम यांनी दिला. एकजिनसी पाकिस्तानला भारतातील समाज आणि येथे राहणार्‍या विविध समाजातील लोकांची एकात्मता समजूच शकणार नाही, असे आशिष शर्मा त्यावर म्हणाले.

संबंधित बातम्या

पाकिस्तानात मुलांसंदर्भात होत असलेल्या गुन्ह्यांवरून परिषदेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न अक्रम करत आहेत, असेही शर्मा म्हणाले. जागतिक दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांमध्ये मुलांच्या सहभागाबाबतही शर्मा यांनी चिंता व्यक्त केली. (Kashmir issue)

Back to top button