

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांचा खास कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या प्रमोद सांडभोर याने मोठा शस्त्रसाठा आणला होता. मात्र, पोलिसांनी सांडभोर टोळीचा हा कट उधळून लावला. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) सांडभोर टोळीवर मोक्काची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई केल्याने मावळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद सोपान सांडभोर (वय 33), अमित जयप्रकाश परदेशी (वय 31), अनिल वसंत पवार (39, सर्व रा. तळेगाव दाभाडे), शरद मुरलीधर साळवी (30, ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी), मंगेश भिमराव मोरे (30, रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अक्षय उर्फ आर्ची विनोद चौधरी (वय 281), देवराज (रा. जळगाव जामोद, बुलढाणा) यांचा शोध पोलीस घेत आहेत. या सर्वांच्या विरोधात पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे.
पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जून रोजी दरोडा विरोधी पथकाने तळेगावमधून प्रमोद सांडभोर आणि शरद साळवी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली. या गुन्ह्याचा अधिक तपास केला असता आरोपींनी आपल्या इतर साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार, अमित परदेशी, अनिल पवार आणि मंगेश मोरे यांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी तीन पिस्तुले व सात काडतूसे, कोयता आणि तलवार असे एकूण सात पिस्तुल आणि 21 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली. आरोपी आपापसात संगनमत करून किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेणार होते. मोक्काचा तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश माने करीत आहे.
सराईतांवर आहेत 26 गुन्हे
अटक केलेल्या आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, खंडणी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून गाड्यांची तोडफोड करुन जाळपोळ करणे, बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणे असे एकूण 26 गुन्हे दाखल आहेत.
आवारेंचा खास अशी ओळख
आरोपी प्रमोद सांडभोर हा किशोर आवारे यांचा खास होता. परिसरात त्याची तशीच ओळख आहे. पोलिस तपासात सांडभोर याने किशोर आवारे यांचा बदला घेण्यासाठीच शस्त्र मागवल्याची कबुली देखील दिली आहे. किशोर आवारे खून प्रकणातील मुख्य सुत्रधार भानू खळदे अजूनही फरार आहे. त्यामुळे मावळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.