यंदा भीमाशंकरला गर्दीचा उच्चांक असणार; प्रशासनाची श्रावणी यात्रा नियोजन बैठक | पुढारी

यंदा भीमाशंकरला गर्दीचा उच्चांक असणार; प्रशासनाची श्रावणी यात्रा नियोजन बैठक

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकरला अधिक श्रावण व श्रावण महिना जोडून आल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. दि. 18 जुलै ते 16 सष्टेंबरदरम्यान होणार्‍या या महापर्वासाठी येणार्‍या भाविकांची गैरसोय होऊ नये, भाविकांना विविध सोयीसुविधा देता याव्यात यासाठी घोडेगाव येथे श्रावणी सोमवार यात्रा नियोजन बैठक आंबेगाव प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

भीमाशंकर देवस्थानचे अ‍ॅड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, उदय गवांदे, दत्तात्रय कौदरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, तहसीलदार संजय नागटिळक, वैशाली वाघमारे, भीमाशंकर सरपंच दत्तात्रय हिले, सविता कोकाटे, सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, उपअभियंता सुरेश पटाडे, संजय मुरकुटे, डॉ. तुषार पवार, शैलेक गिते आदी अधिकारी व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

यावर्षी दि. 18 जुलैपासून अधिक श्रावण सुरू आहे. पुढे दि. 24 जुलै, दि. 7, 14, 21, 28 ऑगस्ट, दि. 4 व 11 सष्टेंबर असे 7 सोमवार आहेत. तसेच या दरम्यान अनेक शासकीय सुट्यादेखील आहेत. त्यामुळे भीमाशंकरला मोठी गर्दी होणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी घोडेगाव येथे विविध विभागांचे अधिकारी, देवस्थानचे पदाधिकारी व प्रमख ग्रामस्थांची बैठक झाली.

भीमाशंकर यात्रा काळात वाहनतळ ते मंदिर या वाहतुकीसाठी मिनी बसचे नियोजन व वाहनतळ बनविणे ही महत्त्वाची कामे आहेत. एसटी महामंडळाने मिनी बस उपलब्ध करून द्याव्यात व अजून मिनी बस लागल्यास पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मिनी बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले. यात्रा काळात 24 बाय 7 आपत्कालीन कक्ष असावा, यामध्ये सर्व विभागप्रमुखांनी थांबावे अथवा आपला प्रतिनिधी ठेवावा.

वाहनतळामध्ये पाणी, स्वच्छतागृह, लाइट, आरोग्य सुविधा, क्रेन, रुग्णवाहिका, कंटेनर रूम याची व्यवस्था केली जावी. अन्न व औषध प्रशासनामार्फत पेढे दुकानदार व हॉटेलमधील अन्नपदार्थ यांची तपासणी केली जावी. भीमाशंकर मंदिराकडे जाणार्‍या पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने सध्या छोट्या रस्त्याने भाविकांना मंदिराकडे जावे लागत आहे. हा पायरी मार्ग लवकर सुरू करावा, अशी मागणी देवस्थानच्या पदाधिकार्‍यांनी केली. सोमवार (दि. 10)पर्यंत पायरी मार्गावर पडलेली माती, मुरूम हटविण्यात येईल व कडेने सुरक्षा कठडे बसवून हा रस्ता सुरू करून दिला जाईल, असे उपअभियंता सुरेश पटाडे यांनी सांगितले.

हेही वाचा

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! नीलम गोऱ्हे यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

नगर : स्वच्छता निरीक्षकाच्या चौकशीचा प्रस्ताव

Jailer Movie : कावला गाण्यात तमन्ना भाटियाच्या पहिल्या गाण्याची झलक (Video)

Back to top button