नगर : स्वच्छता निरीक्षकाच्या चौकशीचा प्रस्ताव | पुढारी

नगर : स्वच्छता निरीक्षकाच्या चौकशीचा प्रस्ताव

नगर : पुढारी वृत्तसेवा : विविध कामांसाठी चार कोटींचा निधी खर्च झाला असून अवघे सात लाख रुपये बाकी असल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र घनकचरा विभागाने शासनाकडे सादर केले. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेत तफावत आढळून आली. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी घनकचरा विभागातील त्या अधिकार्‍यावर विभागीय चौकशी प्रास्तावित केली आहे. घनकचरा विभागाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप प्रठारे यांच्याकडे आल्यानंतर घनकचरा विभागातील कर्मचारी सरळ झाले आहेत. त्यात अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

घनकचरा विभागाकडे बांधकामासह अन्य कामासाठी शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तो निधी संपूर्णपणे खर्च झाला असून, त्यातील अवघे सात लाख रुपये बाकी असल्याचे उपयोगिता प्रमाणपत्र घनकचरा विभागाने तयार केले. त्याचा अहवाल शासनास सादर केला. परंतु, शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवर चार कोटींचा निधी जसाच तसा दिसत होता. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या मनात पाल चुकचुकली. त्यांनी थेट घनकचरा विभागातील अधिकार्‍यांकडे चौकशी केली. मात्र, जुजबी माहिती मिळाल्याने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या. त्यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांच्याकडे खुलासा सादर केला. मात्र, डॉ. पठारे यांनी स्वच्छता निरीक्षक परिक्षित बीडकर यांचा खुलासा नामंजूर केला आहे.

स्वच्छता निरीक्षक बीडकर यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करण्यासंदर्भात आयुक्तांकडे अहवाल सादर केल्याचे सूत्रांकडून समजले. कामगार अधिकारी व स्थानिक अधिकार्‍यांची समिती नेमून चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्या चार कोटीमधून कोणती कामे झाली. त्यासाठी नेमका किती निधी खर्च झाला, याचा चौकशीत खुलासा होणार आहे, असल्याची माहिती समजली.

कामे सुचविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ
घनकचरा विभागाकडे चार कोटींचा निधी येऊन तो माहिती होत नाही. वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर निधी माहिती होते. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी गुरूवारी प्रभागातील शौचालय व घनकचरा विभागामार्फत केली जाणारी कामे सुचविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

घनकचरा विभागात चार कोटींचा निधी कोणत्या हेडमधून आला. तो नेमका कोठे खर्च झाला. याबाबत आपणास कोणत्याही प्रकारची माहिती नसून सविस्तर माहिती घेत आहे.
                                                                                                                                                                                             – रोहिणी शेंडगे, महापौर

Back to top button