सासवडला उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आंदोलन | पुढारी

सासवडला उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेऊर (ता पुरंदर) येथील लीलावती गायकवाड या महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता. आरोपींवर अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल आहे, परंतु आरोपीला पोलिसांनी अद्यापही अटक न केल्याने अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीने बुधवारी (दि.5) उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व विष्णू भोसले, सुनील धिवार, पंकज धिवार यांनी केले. संबंधित घटना दि.23 जूनला घडल्यानंतर 26 जूनला अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीने आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन, उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना दिले.

मात्र, त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग यांना भेटून विनंती केली परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी समतावादी पक्ष संघटना व अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने, बुधवारी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या दालनात चर्चा केली.

दोन दिवसांत आरोपींना अटक न केल्यास विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे. पंढरीनाथ जाधव, गौतम भालेराव, श्रीकांत लक्ष्मीशंकर, कुंडलिक सोनवणे, आप्पा भांडवलकर, मंगेश सोनवणे, राजा क्षीरसागर, पीडिता आदी उपस्थित होते. आंदोलनास शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप, चर्मकार महासंघाचे गुलाबरा सोनवणे, मंगेश गायकवाड, बाळासाहेब इटकर यांनी जाहीर पाठिंबा दिला.

हेही वाचा

शेळगाव : अकरा महिन्यांपासून भरतोय शिक्षकाविना वर्ग

Pawar vs Pawar : शरद पवार भाषण; जाणून घ्या ठळक दहा मुद्दे

पुतण्याला सोडून पाथर्डीचे ‘काका’ काकांच्या मागे!

Back to top button